8 मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन; पणजी शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांची माहिती
पणजी शिगमोत्सव समितीतर्फे राजधानी पणजीत मंगळवार दि. 3 मार्चपासून रविवार दि. 8 मार्चपर्यंत शिगमोत्सवाची धूम चालू राहणार आहे. शनिवारी (दि. 7) सायंकाळी 4 वाजता रोमटामेळ, चित्ररथ, लोकनृत्य, वेशभूषा कलाकारांचा सहभाग असलेली भव्य मिरवणूक जुन्या सचिवालयाकडून सुरू होऊन ती दयानंद बांदोडकर मार्गावरून पुढे कांपाल येथे विसर्जित होईल. याशिवाय आझाद मैदानावर उभारलेल्या कलात्मक रंगमंचावर 8 मार्चपर्यंत दररोज संध्याकाळी 7 वाजता विविध कार्यक्रमांची मेजवानी असेल. पणजी शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत पणजी शिगमोत्सवाची तपशीलवार माहिती दिली.
या पत्रकार परिषदेला समितीचे कार्यकारी अध्यक्ष मंगलदास नाईक, सचिव शांताराम नाईक व कार्यकारी सदस्य किशोर नार्वेकर उपस्थित होते.
चित्ररथ स्पर्धेसाठी 5,35000 रुपये, रोमटामेळ स्पर्धेसाठी 3,95000 रुपये, लोकनृत्य स्पर्धेसाठी 1,28000रुपये व वेशभूषा स्पर्धेसाठी 20,000 रुपये अशी एकूण 10,57,500 रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. धेंपो उद्योग समूहातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिरिक्त बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
चित्ररथ सर्धेतील विजेत्या संघाला मंगलदास नाईक यांनी आपली मातोश्री स्व. श्रीमती पुतू नाईक हिच्या स्मरणार्थ आकर्षक फिरता चषक ठेवला आहे. रोमटामेळ विजेत्या पथकांसाठी किशोर नार्वेकर यांनी आपले बंधू स्व. कृष्णा नार्वेकर यांच्या स्मरणार्थ आकर्षक फिरता चषक ठेवला आहे व लोकनृत्य स्पर्धेतील विजेत्या पथकांसाठी सुनील अनंत नाईक यांनी आपले वडील स्व. अनंत बी. नाईक व मातोश्री यांच्या स्मरणार्थ आकर्षक फिरता चषक ठेवला आहे. याशिवाय वेशभूषा स्पर्धेतील छोट्या आणि मोठ्या गटातील प्रथम विजेत्यांना शांताराम नाईक यांनी आपले वडील स्व. अंकुश नाईक व मातोश्री स्व. भागिरथी नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चषक पुरस्कृत केले आहेत.
आझाद मैदानावरील रंगमंचावर संगीत, नृत्य, नाट्य, लावणी अशा विविधरंगी कार्यक्रमांची पर्वणी असेल. दि. 3 रोजी संध्याकाळी 7 वाजता सत्यवान नाईक प्रस्तुत ‘ओंकार मेलोडिज’चे वाद्यवृंद हिंदी सिनेगीतांची मेजवानी देणार आहेत. दि. 4 रोजी कला चेतना वळवई निर्मित ‘यो घर तुमचेच’ हा सुशांत नाईक यांनी लिहून दिग्दर्शित केलेला कोकणी विनोदी नाट्यप्रयोग सादर होईल. दि. 5 रोजी संध्याकाळी 7 वाजता सिद्धकला डान्स इन्स्टिट्यूटतर्फे जान्हवी बोंद्रे यांनी कोरिओग्राफी केलेला ‘जल्लोष’ हा विविधरंगी नृत्यांचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. शुक्रवार दि. 6 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता निषाद क्रिएशन निर्मित ‘सुरसंगम’ हा मराठी भावगीते, भक्तिगीते, चित्रपटगीते, नाट्यगीते, युगुलगीते, कोळीगीते अशा विविधरंगी व विविधढंगी गीतांचा कार्यक्रम होईल. त्यात गायिका अंतरा कुलकर्णी, आदिश तेलंग व नव्या भट गाणार आहेत. प्रफुल्ल वालावलकर हे निवेदन करतील. दि. 8 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता सोलापूर येथील भाग्यश्री प्रॉडक्शनचा ‘लावण्यखणी’ हा लावणी नृत्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. त्यापूर्वी ज्येष्ठ भजनी कलाकार उमाकांत लाडू वाडकर, ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक तथा रंगभूषाकार सुरेंद्र वळवईकर, तियात्र रंगभूमीवरील नामवंत कलाकार मॅक्सी परेरा व पणजी शिगमोत्सव समितीचे संस्थापक सदस्य अवधूत आंगले यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अनेक आव्हानांना तोंड देत
शिगमोत्सव साजरा : धेंपो
राजधानीत गेली 37 वर्षे शिगमोत्सव साजरा करताना अनेक आव्हानांना पणजी शिगमोत्सव समितीला तोंड द्यावे लागले; परंतु प्रशासन, पर्यटन खाते, महानगरपालिका, स्थानिक आमदार यांच्या सहकार्यामुळे यशस्वी आयोजन करणे शक्य झाले. पणजी शिगमोत्सव समितीने गावातील पारंपरिक लोकसंस्कृती प्रथम शहरात आणली. त्यानंतर आता हा शिगमोत्सव प्रत्येक मतदारसंघातही होत आहे. पणजी शिगमोत्सव समिती एकोप्याने कार्य करत आहे. ही एकमेव शिगमोत्सव समिती जिचे स्वतंत्र कार्यालय आहे, असे श्रीनिवास धेंपो यांनी आवर्जून नमूद केले.
श्रीनिवास धेंपोंकडून खंत व्यक्त
पणजीत अनेक महोत्सव होतात. त्यांना भरभक्कम निधी मिळतो, तसा निधी आम्हाला मिळत नाही, तरी आम्ही दात्यांकडून अतिरिक्त निधी गोळा करून दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी दरवर्षी देतो. अनेक पर्यटकांना गोव्याच्या खऱ्या संस्कृतीचे यानिमित्ताने दर्शन घडते, हेही श्रीनिवास धेंपो यांनी आवर्जून निदर्शनास आणले. तसेच यंदाची भव्य चित्ररथ मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी विशेषतः रोमटामेळ पथकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
उद्या स्पर्धांच्या अर्जांचे वितरण
पर्यटन खात्याच्या आदेशानुसार दि. 4 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत विविध स्पर्धांचे विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून दिले जातील व दुपारी 1 वाजता रोमटामेळ पथकांचा सादरीकरणाचा क्रम चिठ्ठीद्वारे ठरवण्यात येईल. अधिक माहितीकरिता 9822980731 क्रमांकावर संपर्क साधावा.
आझाद मैदानावर आज गुलालोत्सव
मंगळवार दि. 3 मार्च रोजी सकाळी 9 वाजता महालक्ष्मीला नमन करून पणजी शिगमोत्सव समिती पारंपरिक रोमटामेळासह आझाद मैदानाकडे निघेल व तिथे मग ‘ओम बिट्स’ वाद्यवृंदाच्या तालावर गुलालोत्सवाचा (रंगपंचमीचा) आनंद आबालवृद्ध लुटतील. दरवर्षी या गुलालोत्सवात पर्यटकही मोठ्या संख्येने सहभागी होऊन बेधुंद नाचतात.