बोरी येथील पेट्रोल पंप जवळ प्रवासी बस आणी स्कुटर यांच्यात झालेल्या अपघातात मनोज देसाई (38, नवदुर्गा मंदिर जवळ- बोरी) याचा रविवारी सकाळी गोमेकॉत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघातानंतर स्कूटर बसच्या समोरील भागात अडकून राहिली. शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अपघात घडला असून फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला होता.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए 02 टी 4852 क्रमांकाची प्रवासी बस फोंडाहून सावर्डे येथे जात होती. बोरी येथील पेट्रोल पंपजवळ पोहोचताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या जीए 05 क्यू 5785 क्रमांकाच्या स्कूटरची प्रवासी बसला समोर जोरदार धडक बसली. यात स्कूटरचालक मनोज देसाई हा गंभीर जखमी झाला. जखमीला सर्वप्रथम 108 रुग्णवाहिकेतून शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले. रात्री उशिरा अधिक उपचारासाठी जखमीला मडगाव येथील इस्पितळात नेण्यात आले. उपचाराला दाद देत नसल्याने शेवटी मध्यरात्री जखमीला गोमेकॉत नेण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष वेळीप व हवालदार रामदास गावडे अपघाताचा पंचनामा केला आहे.