Home Featured अस्थानी नंगानाच

अस्थानी नंगानाच

0

नवी दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटने संपूर्ण देशामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात उतरण्याची आणि काही करून दाखवण्याची ऊर्जा निर्माण केली असताना आणि अवघे जग भारताच्या ह्या सज्जतेकडे अचंब्याने पाहत असताना काल युवक काँग्रेसच्या मूठभर कार्यकर्त्यांनी परिषदेच्या ठिकाणी शर्ट उतरवून जो काही नंगानाच घातला, तो देशाला मान खाली घालायला लावणारा आणि अत्यंत निषेधार्ह आहे. दोन दिवसांपूर्वी एका खासगी विद्यापीठाने चिनी बनावटीचा रोबो कुत्रा आपल्या विद्यार्थ्यांनी बनवल्याचा दावा करत तेथे देशाची लाज काढलीच होती. युवक काँग्रेसची कालची निदर्शने ही त्यावरही वरताण म्हणावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेशी व्यापार करार करून तडजोड केली, हा संदेश म्हणे ह्या आंदोलकांना द्यायचा होता. त्यासाठी त्यांनी मोदींचे छायाचित्र व तसा संदेश असलेली टीशर्टही निदर्शनांदरम्यान फडकवली. पण ही निदर्शने एआय समिटमध्ये कशाला? त्याचा अमेरिकेच्या व्यापार कराराशी ना काही संबंध होता, ना तिथे काल मोदींची उपस्थिती होती. सवंग प्रसिद्धीसाठी, परंतु अत्यंत पद्धतशीरपणे एखादे कटकारस्थान तडीस न्यावे तशा प्रकारे ही निदर्शने केली गेलेली दिसतात. बरे, हे निदर्शक कोणी ऐरेगैरे कार्यकर्तेही नाहीत. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे हे सारे वरिष्ठ पदाधिकारी आहेत. कोणी राष्ट्रीय समन्वयक आहे, कोणी राष्ट्रीय सरचिटणीस आहे, कोणी बिहारचा राज्य सचिव आहे, कोणी उत्तर प्रदेशचा राज्य उपाध्यक्ष आहे. म्हणजेच वेगवेगळ्या राज्यांतून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आणून पद्धतशीरपणे हा कट शिजवला गेला होता. त्यांनी मोदींवर टीका करणारी टीशर्ट घातली, त्यावर स्वेटर व जॅकेटे चढवली आणि एआय समिटचा रीतसर पास काढून त्यांनी आत प्रवेश मिळवला. तेथे त्यांनी स्वेटर व जॅकेट उतरवली. ही निदर्शने एवढ्यावर थांबली असती, तरीही एकवेळ हरकत नव्हती, परंतु एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये महिला प्रतिनिधींसमक्ष आपले शर्ट उतरवून उघड्या अंगाने मिरवत आणि टीशर्ट फडकवत जो काही नंगानाच घातला गेला तो अवघ्या देशाला शरमिंदे करणारा आहे. काँग्रेस आणि त्याच्याशी संलग्न संघटनांची सध्या समस्या हीच आहे की देश एका बाजूने असतो आणि ही मंडळी दुसऱ्याच बाजूने चालत असतात. म्हणूनच जेव्हा सर्जिकल स्ट्राईकचा आनंद देश साजरा करतो, तेव्हा हे त्याच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करत राहतात. बालाकोटपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत देश गौरवान्वित होत असताना काँग्रेस नेते मात्र भारतीय सैन्यदलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी तर परदेशात व्याख्यान देताना तेथून मोदींवर टीका करण्याच्या नादात भारत सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा बालिशपणा करीत असतात. एआयच्या क्षेत्रामध्ये आज भारत काही करून दाखवण्यासाठी पुढे सरसावतो आहे. अशा वेळी त्या प्रयत्नांना देशहितार्थ साथ देण्याऐवजी हा असला नंगानाच घालण्याचा हा कसला प्रकार? राजीव गांधी आज असते तर त्यांनी खचितच ह्या असल्या पोरकटपणाला थारा दिला नसता. किंबहुना ह्या देशामध्ये संगणक आले तेच मुळी राजीव गांधींमुळे. तंत्रज्ञानावर स्वार होऊन देशाच्या समस्या दूर सारण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. दुर्दैवाने त्यांची अकाली हत्या झाली आणि ते स्वप्न विरून गेले. राजीव यांचे पुत्र राहुल गांधी मात्र अजूनही आपल्या तरुण तुर्काच्या रूपातून बाहेर पडून एका पोक्त नेत्याचे रूप दाखवू शकलेले नाहीत ही काँग्रेस पक्षाची शोकांतिका आहे. अमेरिकेशी मोदी सरकारने केलेल्या व्यापार कराराविषयी एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आक्षेप घेण्याचा, टीका करण्याचा हक्क राहुल आणि त्यांच्या पक्षाला, युवक काँग्रेसला नक्कीच आहे, परंतु एआय इम्पॅक्ट समिट ही ती जागा नक्कीच नव्हती. आणि त्यातही कपडे उतरवून नंगानाच घालण्याची पद्धत तर अगदीच ओंगळवाणी आणि देशाची अब्रू घालवणारी होती. हा काही भाजपचा कार्यक्रम नव्हता. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये भारतात किती वाव आहे, आपल्या देशामध्ये ह्या क्षेत्रामध्ये किती प्रयत्न चालले आहेत हे जगापुढे मांडण्यासाठी ह्या एवढ्या मोठ्या परिषदेचा घाट भारताने घातला होता. त्याकडे क्षुद्र राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहणे आणि तेथे अशा प्रकारचा घातपात घडवणे हे मुळीच समर्थनीय ठरत नाही. राहुल गांधींच्या निर्देशाखाली झालेल्या ह्या आंदोलनातून त्यांनी पुन्हा एकदा स्वतःची आणि पक्षाची पत घालवली आहे. राजकारणामध्ये सरकारच्या चुकीच्या वाटणाऱ्या नीतीला विरोध करण्याचा अधिकार विरोधी पक्षाला नक्कीच आहे, परंतु कधी, कुठे आणि कशाप्रकारे आपला विरोध नोंदवावा ह्याचेही काही तारतम्य असावे लागते. एआय इम्पॅक्ट समिट सांगतेकडे वाटचाल करीत असताना त्याला गालबोट लावले गेले हे उचित झाले नाही हे निश्चित.