राजधानीतील नव्या पाटो पुलाचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आल्याने काल पणजी शहरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. त्याचा फटका वाहनचालक आणि नागरिकांना बसला.
या कोंडीचा फटका पाटो पूल परिसराबरोबरच पणजी बसस्थानक परिसर तसेच अन्य संलग्न रस्त्यांनाही बसला. पणजी-पर्वरी मार्गावरील वाहतुकीवरही या वाहतूक कोंडीचा परिणाम झाला. या रस्त्यावरील वाहतूक काल दुपारी सुमारे तासभर खोळंबल्याने विद्यार्थी, नोकरदार वर्ग व अन्य प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. भर दुपारी वाहने खोळंबल्याने वाहनांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे उष्णतेमुळे प्रचंड हाल झाले. वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था न करताच पाटो पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने अन्य वाहनांबरोबरच शहरातून जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. मात्र, वाहतुकीची एवढी कोंडी झालेली असताना वाहतूक पोलीस मात्र कुठेही दिसत नव्हते. परिणामी काही ठिकाणी नागरिकांनीच पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.