राज्यातील नागरिकांना विरोधकांची आघाडी हवी आहे; काँग्रेस पक्षाने निवडणूक आघाडीबाबत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाची (आरजीपी) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी आहे; पण त्यासाठी स्पष्ट कालमर्यादा निश्चित केली पाहिजे. राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी आमचा विश्वासघात करण्यात आला होता. त्यावेळी चर्चेसाठी योग्य वेळ नाकारण्यात आला. तशी वागणूक पुन्हा सहन केली जाणार नाही, असा इशारा आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनी पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिला.
काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी आघाडीबाबत केलेल्या विधानावरून काँग्रेस नेत्यांमध्ये आघाडीच्या विषयावर एकमत नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे विरोधी पक्षांची आघाडी नको असलेल्या व्यक्तींच्या प्रभावाखाली वावरत आहेत, असा आरोप आमदार वीरेश बोरकर यांनी केला.
आरजीपी आगामी निवडणुकीसाठी आघाडी करण्यास तयार आहे; परंतु गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याकडून आघाडीच्या प्रक्रियेत अडथळा आणला जात आहे. अमित पाटकर आणि खासदार विरियातो फर्नांडिस यांनी वारंवार केलेल्या निराधार विधानातून काँग्रेस नेतृत्वातील एका गट आरजीपीशी जुळवून घेण्यास तयार नाही, हे स्पष्ट होते, असे बोरकर म्हणाले. केंद्रीकृत निर्णय प्रक्रिया आणि राजकीय कठोरता आघाडीच्या चर्चेतील प्रगती रोखत आहे. सकारात्मक परिणाम साध्य करायचा असेल तर हा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. आम्ही विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार आल्टन डिकॉस्टा यांच्या संपर्कात आहोत, असेही ते म्हणाले.