Home Featured पायलटच्या मदतीनेचअजित पवारांचा घातपात!

पायलटच्या मदतीनेचअजित पवारांचा घातपात!

0

आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी बारामतीत दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी असतानाही वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांनी विमान माघारी न फिरवता खाली उतरवले. त्यांनी विमानाचा स्फोट, अपघात करण्यासाठीच विमान मुद्दाम खाली आदळले, असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक नव्या शंका उपस्थित केल्या. यावेळी त्यांनी विमानाचा पायलट सुमित कपूर आणि व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोपही केले.

मुंबईवरुन बारामतीला जाण्यासाठी फार इंधनाची गरज नव्हती, तरीही अजितदादांच्या विमानाच्या पंखातील इंधनाच्या टाक्या पूर्णपणे भरण्यात आल्या होत्या. हे विमान बारामतीवरुन हैदराबादला जाणार होते. तिथे विमानात पुन्हा इंधन भरता आले असते. मात्र, हे विमान सुरतवरुन मुंबईला येत असतानाच त्याच्या इंधन टाक्या पूर्णपणे भरल्या होत्या. या विमानात अपघाताच्या वेळी 3000 ते 3500 लीटर इंधन होते. एवढेच नव्हे तर विमानाच्या टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅनही ठेवले होते. या सगळ्यात पायलटचा वापर करुन अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडवण्यात आला, असे आम्हाला वाटते. विमानात जास्त इंधन असेल तर मोठा स्फोट होईल, हा आमचा संशय खरा ठरताना दिसत आहे, असे रोहित पवार म्हणाले.

बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी दृश्यमानता कमी असूनही पायलट सुमित कपूर यांनी माघारी न फिरता एक गिरकी घेऊन विमान खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. किंबहुना त्यांनी विमान मुद्दाम खाली आदळले आणि स्फोट घडवून आणला, असा आरोप रोहित पवार यांनी केला.