गोवा खंडपीठाचा आदेश
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोव्यातील किनारी भागांतील सर्व ग्रामपंचायतींना त्यांनी जारी केलेल्या व्यापार परवान्यांच्या संख्येची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश काल दिले आहेत, अशी माहिती महाअधिवक्ता देविदास पांगम यांनी दिली.
हडफडेे येथील 6 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील भीषण आग प्रकरणातील स्वेच्छा दखल याचिकेच्या सुनावणीच्या वेळी खंडपीठाने हा निर्देश दिला आहे. या आगीच्या घटनेत 25 जणांचा बळी गेला आहे. या आगीत मृतांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या प्रकरणाची सुनावणी मंगळवार 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे, असेही ॲड. पांगम यांनी सांगितले.
या प्रकरणात नाइट क्लबचे मालक लुथरा बंधू आणि माजी सरपंचांसह प्रतिवादींनी त्यांचे उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला होता, जो मंजूर करण्यात आला. सर्व पक्षांनी त्यांचे उत्तर सादर केल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी केली जाणार आहे.
ही स्वेच्छा दखल याचिका व्यापक पद्धतशीर चिंता दूर करण्याच्या उद्देशाने आहे आणि भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दीर्घकालीन प्रतिबंधात्मक उपायांचे परीक्षण करण्याचा हेतू आहे. न्यायालय अशा घटनांसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याच्या मुद्द्यावरही लक्ष देत आहे, असेही ॲड. पांगम यांनी सांगितले.