Home अंगण नमः शिवाय

नमः शिवाय

0
  • मीना समुद्र

महाशिवरात्र ही सृष्टीमध्ये शिवतत्त्व जागविते. शिवलिंगाभिषेक, शिवपूजा, नामस्मरणाने ही पवित्र रात्र जागविण्याची पद्धत आहे. निराहाराने किंवा फलाहाराने शरीरशुद्धी आणि मनाची एकाग्रता, शांतता मिळते. आत्मबळ वाढविणारी, संयम शिकविणारी ही शिवभक्ती आहे.

आज 15 फेब्रुवारी 2026; महाशिवरात्रीचा पर्वकाळ. तशी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला शिवरात्र येते; परंतु माघ महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला येणारी ही शिवरात्र सर्वात मोठी मानली जाते आणि ती सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरी केली जाते.
ब्रह्मा, विष्णू, महेश या देवत्रयींनी आपले आध्यात्मिक विश्व व्यापले आहे. ब्रह्मा सृष्टीचा निर्माणकर्ता, विष्णू हा पालनकर्ता आणि शिव हा संहारकर्ता मानला गेला आहे. तरीही शिव हा सर्व प्राणिमात्रांचा कल्याणकर्ता आहे; त्राता आहे. समुद्रमंथनकाळी देव-दानवांनी सर्पाची दोरी ताणली असता त्याच्या तोंडातून बाहेर पडणारे विष सृष्टीचा विनाश करेल हे जाणून शंकराने ते प्राशन केले आणि तो नीलकंठ झाला, पण तो देवाधिदेव महादेव म्हणून जगत्‌‍ वंदनीय झाला. कोणत्याही पदाची, प्रतिष्ठेची, जिवाची तमा न बाळगता लोकहित साधण्यासाठी, त्यांचे रक्षण करण्यासाठी जबाबदारीने धावून जाण्याचा हा आदर्श घेण्यासारखा!
विष्णूची सहस्रनामे घेतली जातात तशी शंकराचीही अनंत नामे आहेत. त्याच्या रूपगुणावरून आणि कर्मावरून ती पडलेली आहेत. गळ्यात नाग म्हणून नागेश, ‘त्राहिमाम गिरीश’ अशा हाकेला धावून जाणारा मंगेश, कल्याणकर्ता म्हणून शिव, पवित्र- शुभ म्हणून शिवशंभू, भाळी अर्धचंद्र म्हणून भालचंद्र, विषप्राशनानंतरचा निळा कंठ झालेला नीलकंठ, पशूंच्या सहवासातला पशुपतिनाथ, अतिशय लवकर पूजाप्रार्थनेने संतुष्ट होणारा म्हणून आशुतोष, उमेचा-पार्वतीचा पती तो उमेश- पार्वतीश, श्रीरामाने पूजिलेला तो रामेश्वर, महादेव म्हणून महेश्वर, त्रिपुरासुराला जाळणारा तो त्रिपुरारी, तीन डोळे असलेला त्रिलोचन. हा ईश आहे, सर्वेश आहे, महेश आहे, सदाशिव आहे, भोलाशंकर आहे. भोलेनाथ, आत्मेश्वर, केशवनाथ, रामनाथ, पार्वतिपरमेश्वर आहे. शिवाची पूजास्थाने लहानमोठ्या प्रमाणात गावागावांत, शहरांत, डोंगरावर, नदीकाठी, समुद्रतीरी अशी सर्वत्र आढळतात. महाशिवरात्रीला शिव हा प्रथम ज्योतिस्वरूपात आणि मग लिंगरूपात प्रकटला आणि ब्रह्मा-विष्णूसाठीही तो पूज्य बनला. अशी बारा ज्योतिर्लिंगे ही भारतीयांची अतिशय पवित्र तीर्थस्थाने आहेत. सौराष्ट्रात सोरटी सोमनाथ, श्रीशैल्य इथला मल्लिकार्जुन, कालिदासाने उज्जयिनीच्या ज्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याला मेघाला सांगितले तो उज्जयिनीचा महाकालेश्वर, परळीचा वैजनाथ, ओंकार अमलेश्वर, पुण्याजवळचा भीमाशंकर, रामेश्वरचा रामेश, वाराणशीचा विश्वेश, गौतमीतटीचा त्र्यंबकेश्वर, हिमालयातला प्रसिद्ध केदारनाथ, एलोराचा घृष्णेश्वर अशी ज्योतिर्लिंगे भाविक भक्तांनी प्रचंड गर्दीने ओसंडून वाहत असताना दिसतात. फार पूर्वीपासून पर्यटनही जोरात चाललेले दिसते.
महाशिवरात्रीच्या पर्वकाळी नदी वा समुद्रस्नानाचेही खूप महत्त्व आहे; तसेच शिवरात्र ही निराहार राहून भजन-पूजन-संकीर्तन यात व्यतीत करणे हे शरीरप्रकृती आणि मनःशांतीसाठी आवश्यक आहे. शिवालये ही जनी-विजनी सर्वत्र आढळतात. शांत एकांत हा या शिवयोग्याला अतिशय प्रिय आहे. आपल्या वेद-पुराणांनी वर्णन केलेल्या अनेक शिवकथा आहेत; पण श्रीधराचे ‘शिवलीलामृत’ ही अत्यंत रसाळ, काव्यात्मक, श्लोकबद्ध आणि भक्तिरसाने ओथंबलेली कथात्मक अशी ग्रंथरचना आहे. समजायला अतिशय सोपी अशी ही मराठी भाषेतली लोकप्रिय रचना आहे.

द्वितीयेचा किशोर इंदू। त्यासी जीर्णदशी वाहती दीनबंधू
तैसे तुझे गुण करुणासिंधू। वर्णीतसे अल्पमती

द्वितीयेच्या चंद्रकोरीला एखादं जीर्ण सूत अर्पण करून ‘जुनं घे, नवं दे’ म्हणण्याची प्रथा आहे. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे गुणवर्णन करून या करुणासिंधूला हा ग्रंथ अर्पण करीत आहे, असे अतिशय नम्रतेने म्हणून श्रीधरकवींनी हा ग्रंथ लिहिला आहे. त्याचे पारायणही शिवरात्रीला केले जाते. मथुरानगरीचा राजा काशीची राजकुमारी शिवभक्त कलावती हिच्या सान्निध्याने पापमुक्त होतो ही कथा पहिल्या अध्यायात येते. दुसरा अध्याय महाशिवरात्रीला विंध्य पर्वताच्या घनदाट अरण्यात एका व्याधाने हरणाच्या शिकारीसाठी बाण रोखल्यावर त्या पशूचे वर्तन; त्याने दिलेले वचन पाळून शिकार होण्यासाठी मुलाबाळांसह परत येणे आणि त्यांच्या वचनबद्धतेने आणि भक्तीने दिपून त्या प्रामाणिक पशूमुळे व्याधाचे नतमस्तक होणे आणि सर्वांचेच उद्धरून जाणे अशी भक्तिभावनेची कथा आहे. तसेच शिवाला बिल्वपत्र आणि नामस्मरणानेही संतुष्ट करता येते हेही कळते. आपण स्नान करतानाही ‘हर हर शंभो’ म्हणतो आणि हातून काही वाईट घडले तरी ‘हर हर’ म्हणतो. शिवनाम हे घ्यायला, उच्चारायला किती सोपे आहे. ‘हर हर’ म्हटल्याने पाप आणि दुरिताचा नक्कीच नाश होत असला पाहिजे. गोवत्साचा वध म्हणजे केवळ मोठे पाप; पण त्याही पापातून एक अपवित्र चांडाळीण केवळ नामस्मरणाने उद्धरून जाते. कल्माषपाद राक्षस, गोपबाळासाठी शिवाने उभारलेले रत्नतडित शिवमंदिर, भद्रायूची कथा, शिवयोग्याचा उपदेश, सीमंतिनी, भस्मासूरवध, शबराची भक्तिभावना, शारदा, 11 व्या अध्यायातला रुद्रमहिमा, महानंदा, तारकासुरवध, कार्तिकेयाची जन्मकथा, वामदेवआख्यान, बाल कार्तिकेय आणि गणेशाचे भांडण, शिवपार्वतीचा सारिपाटाचा डाव, चिलयाबाळाची कथा अशा 14 अध्यायातल्या चित्रविचित्र, अद्भुत कथा वाचताना भान भरपून जाते. जगद्गुरू शंकराचार्यांची एक कथा 15 व्या अध्यायात येते. पण पारायणासाठी 40 श्लोकी शिवलीलामृतही वाचले जाते.

महाशिवरात्र ही सृष्टीमध्ये शिवतत्त्व जागविते. शिवलिंगाभिषेक, शिवपूजा, नामस्मरणाने ही पवित्र रात्र जागविण्याची पद्धत आहे. निराहाराने किंवा फलाहाराने शरीरशुद्धी आणि मनाची एकाग्रता, शांतता मिळते. आत्मबळ वाढविणारी ही शिवशक्ती आहे. संयम शिकविणारी ही शिवभक्ती आहे. ॐ नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर महादेव असा उच्चार नेहमी घडावा. ‘शिव शिव म्हणता वाचे, मूळ न राहे पापाचे, ऐसे महात्म्य शंकराचे, निगमागम वर्णिती’- असे श्रीधराचे वचन स्मरून महाशिवरात्र जागवावी.