कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आजच्या युगाचा परवलीचा शब्द बनला आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एआय आज क्रांती घडवीत आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रात आघाडी घेण्याची तीव्र स्पर्धा विविध देशांत लागली आहे. भारतही ह्यात मागे नाही. त्यामुळेच नवी दिल्लीमध्ये आजपासून म्हणजेच सोळा फेब्रुवारीपासून वीस फेब्रुवारीपर्यंत एक भव्य दिव्य असे एआय इंपॅक्ट समिट भरविण्यात आले आहे. केवळ भारतातीलच नव्हे, तर ज्याला राजनैतिक भाषेमध्ये ग्लोबल साऊथ संबोधले जाते, त्या संपूर्ण प्रदेशातील ही अशा प्रकारची पहिलीच आंतरराष्ट्रीय परिषद आहे. ह्या परिषदेमध्ये चॅट जीपीटीकर्त्या ओपनएआयचे सीईओ सॅम अल्टमनपासून गुगलच्या सुंदर पिचईपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील ‘हूज हू’ सहभागी होणार आहेत. भारतातील अदानी, अंबानी, प्रेमजी, मित्तल वगैरे वगैरे सर्व प्रमुख उद्योगपतींचाही ह्या परिषदेत सहभाग राहणार आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये नवी झेप घेऊ पाहणाऱ्या भारतासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आज बहुतेक क्षेत्रांत सुरू झाला आहे. काहींमध्ये तो प्राथमिक पातळीवर आहे, काहींमध्ये उच्च स्तरावर पोहोचला आहे, परंतु येणाऱ्या काही वर्षांत एआयशिवाय आपले पान हलणार नाही अशी परिस्थिती येणार आहे. त्यामुळेच ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मानवाजातीपुढे उद्भवणाऱ्या धोक्यांची चर्चा अत्यंत गांभीर्याने सध्या जगभर सुरू आहे आणि ह्या तंत्रज्ञानाच्या गैरवापरास रोखण्यासाठी देशोदेशीची सरकारे पुढे सरसावली आहेत. भारत सरकारनेही नुकताच एआयद्वारे निर्मित छायाचित्रे, व्हिडिओ व इतर आशयावर ते एआयद्वारे निर्मित असल्याचे लेबल लावणे सक्तीचे केलेले आहे. हे पाऊल आवश्यकच होते, कारण आज कोणीही उठावे आणि एआय साधनांचा वाट्टेल तसा वापर वा गैरवापर करावा असे चालले आहे. भारतात भरत असलेल्या ह्या परिषदेतील विविध सत्रांतून भारताची ह्या क्षेत्रातील भावी विकास वाटचाल कशी असावी ह्याचा रोडमॅप आखला जाईल अशी अपेक्षा आहे. आपल्या देशामध्ये आज सरकारी आणि खासगी पातळीवर एआयच्या क्षेत्रात प्रचंड काम चालले आहे. सर्व ते केवळ उच्चभ्रूंपुरते किंवा इंग्रजीपुरते सीमित नाही, तर सर्व संवैधानिक भारतीय भाषांमध्ये ते चालले आहे. म्हणजेच तळागाळातील समाजापर्यंत लवकरच एआय ह्या ना त्या तऱ्हेने जाऊन पोहोचणार आहे. भारत हा विशाल लोकसंख्येचा देश आहे, परंतु एखादी गोष्ट देशाने ठरवली की ती बघता बघता सर्वदूर पसरते हेही तितकेच खरे आहे. दहा वर्षांपूर्वी यूपीआय ही कविकल्पना वाटली असती. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल फोन आहे आणि त्यावरील आर्थिक व्यवहार यूपीआयद्वारे होत आहेत. ही क्रांती अशा वेगाने घडते आहे. त्यामुळे एआयचा प्रसार देखील अशाच वायूवेगाने होणार आहे ह्याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. त्यामुळे ह्या प्रवासाला दिशा असणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच ह्या पहिल्यावहिल्या एवढ्या मोठ्या स्तरावरील परिषदेकडे देश आशेने आणि अपेक्षेने पाहतो आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये जगभरात काय काम चालले आहे, आपण कोठे आहोत आणि आपल्याला कोठे जायचे आहे, ह्याचा खल ह्या परिषदेमध्ये होईल. भारतीय उद्योगपतीही ह्या क्षेत्रात कोट्यवधी रुपये गुंतवायला सज्ज आहेत. काहींनी तर ह्या क्षेत्रात कामही सुरू केले आहे. त्यामुळे भारताने मनात आणले तर एआयच्या क्षेत्रात आघाडी घेणे भारताला निश्चितपणे शक्य आहे. आज भारतीय बुद्धिमत्ताच विदेशांमध्ये परदेशी कंपन्यांसाठी अहोरात्र काम करते आहे. ह्या भारतीय बुद्धिमत्तेचा वापर देशासाठी, देशाच्या प्रगतीसाठी, देशाला अधिक सुरक्षित आणि बलशाली करण्यासाठी, विकसित आणि प्रगत करण्यासाठी व्हायला हवा. त्यादृष्टीने संधींची निर्मिती देशात व्हायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत’ची जी हाक दिलेली आहे, त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हेही प्रमुख अंग राहणार आहे. ज्या ज्या क्षेत्रांमध्ये आपण मागे होतो आणि दुसऱ्या देशांवर अवलंबून होतो, त्या त्या क्षेत्रांमध्ये आपण आता काम सुरू केलेले आहे. उदाहरणार्थ, मायक्रोचिप्स किंवा सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रामध्ये आपण आजवर इतर देशांवर अवलंबून होतो, परंतु बदलत्या जागतिक समीकरणांकडे पाहता, ह्या क्षेत्रांमध्येही आत्मनिर्भरता प्राप्त करणे महत्त्वाचे राहणार आहे ही जाणीव आपल्याला उशिरा का होईना आज झालेली आहे. झालेल्या घोषणा प्रत्यक्षात किती उतरतात, न उतरतात हा भाग वेगळा, परंतु निदान कामाची सुरूवात झालेली आहे. ह्या मार्गावरून न ढळता प्रगती साधणे ही आता सर्वांचीच जबाबदारी राहणार आहे. भारताची लोकसंख्या म्हणजेच मनुष्यबळ हीच भारताची सर्वांत मोठी ताकद ठरू शकते. मग तो व्यापार असो किंवा मानवी बुद्धिमत्ता. अर्थात त्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर द्यावा लागेल. भारतीय जनतेच्या हितासाठी, नव्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. दिल्लीतील एआय परिषद हा त्याचा प्रारंभबिंदू ठरावा.