Home बातम्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आजपासून भारत दौऱ्यावर

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आजपासून भारत दौऱ्यावर

0

राफेल करारावर शिक्कामोर्तब होणार भारताला मिळणार 114 राफेल लढावू विमाने

भारत फ्रान्ससोबत 3.25 लाख कोटी रुपयांमध्ये 114 राफेल लढाऊ विमानांचा करार करणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा आज सोमवारपासून तीन दिवसांचा भारत दौरा सुरू होत आहे. याच दरम्यान या करारावर शिक्कामोर्तब होईल. या 114 पैकी 24 विमाने सुपर राफेल असतील, जी फ्रान्सची विमान उत्पादक कंपनी दसॉ एव्हिएशन एफ-5 नावाने बनवत आहे.

सध्या वायुसेनेकडे एफ-3 राफेल आहेत, जी 4.5 जनरेशनची लढाऊ विमाने आहेत. यांमध्ये स्टेल्थ क्षमता आणि अणुबॉम्ब डागण्याची शक्ती आहे. परंतु, नवीन विमाने एफ-4 पिढीची आहेत. म्हणून त्यांना 5व्या जनरेशनचे म्हटले जात आहे.
एफ-5 राफेल प्रत्यक्षात सहाव्या पिढीची जेट विमाने असतील. फ्रान्सनंतर अशा प्रकारची सर्वोत्तम विमाने भारतीय वायुसेनेकडे असतील. एफ-5 सध्या विकासाच्या टप्प्यात आहेत. एफ-4 चा पुरवठा 2028-29 पासून सुरू होईल. 2030 नंतर जी विमाने मिळतील, ती एफ-5 श्रेणीची सुपर राफेल असतील.
सुपर राफेल अमेरिकेच्या एफ-35 आणि रशियाच्या सुखोई-57 पेक्षा पुढच्या पिढीचे फायटर विमान असेल. या करारानुसार 88 राफेल सिंगल सीटर आणि 26 डबल सीटर असतील, ज्यांचा वापर प्रशिक्षण आणि लढाऊ अशा दोन्ही भूमिकांमध्ये करता येईल.

96 राफेल भारतात बनणार
दसॉ एव्हिएशनकडून 18 विमाने उड्डाणासाठी तयार स्थितीत मिळतील. उर्वरित 96 भारतात बनवले जातील. यांचे 60% सुटे भाग स्वदेशी असतील. हा भारताचा सर्वात मोठा संरक्षण करार आहे. या प्रस्तावाला 16 जानेवारी रोजी संरक्षण खरेदी मंडळाकडून मंजुरी मिळाली होती. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, नवीन राफेल विमानांच्या खरेदीमुळे एअर डिफेन्स आणि सीमावर्ती भागात तैनातीची क्षमता मजबूत होईल.

राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नौदलासाठी 6 अमेरिकन बोइंग पाळत ठेवणारी विमाने, लढाऊ क्षेपणास्त्रे आणि एअर-शिप आधारित उच्च उंचीवरील स्यूडो सॅटेलाइट्सच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. या सर्व करारांची एकूण किंमत 3.60 लाख कोटी रुपये आहे.
डसॉल्ट सर्व 114 राफेल जेटमध्ये भारतीय शस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि दारूगोळा एकत्रित करेल. तसेच सुरक्षित डेटा लिंक देखील उपलब्ध करून देईल, ज्यामुळे विमानांना भारतीय रडार आणि सेन्सर प्रणालीशी जोडता येईल.

असा असेल दौरा

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज सोमवारी 16 फेब्रुवारीपासून भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मॅक्रॉन यांच्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक जारी केले आहे, ज्यात ते 16 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा दिल्लीत पोहोचणार आहेत आणि 17 फेब्रुवारी रोजी त्यांचा मुंबईत कार्यक्रम आहे. पंतप्रधान मोदी मुंबईत मॅक्रॉन यांच्यासोबत असतील, जिथे राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होतील आणि प्रेस स्टेटमेंट जारी केले जाईल. मॅक्रॉन यांचा दौरा 19 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे आणि ते संध्याकाळी पॅरिसला रवाना होतील.