राज्य सरकारने कला अकादमी नूतनीकरण प्रश्नी नियुक्त कृती दल समितीच्या बैठकीत कला अकादमीतील त्रुटींचा अहवाल तयार करण्यासाठी पाच तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीचा त्रुटीसंबंधीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर साधारण ऑगस्ट 2026 पासून त्रुटींच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती गोवा कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी कला अकादमीच्या आवारात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली.
कला अकादमीचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. सरकारने नियुक्त कृती दल समितीला त्रुटींबाबतचा अहवाल लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली आहे. कला अकादमीतील त्रुटींबाबत अहवाल तयार करण्यासाठी एका तज्ज्ञांच्या समितीची निवड करण्यात आली आहे. त्यात ध्वनी, प्रकाश योजना व इतर क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्रुटी सुधारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती चंद्रकांत कवळेकर यांनी दिली.
आपण कृती दल समितीने आयोजित दोन बैठकांना उपस्थिती लावली. तिसऱ्या बैठकीच्या वेळी दौऱ्यावर असल्याने उपस्थित राहू शकलो नाही. कंत्राटदार दोन बैठकांना अनुपस्थित राहिला होता. त्याने तिसऱ्या बैठकीला हजेरी लावली, असेही कवळेकर म्हणाले.