Home बातम्या आपच्या आमदारांनीसाधला जनतेशी संवाद

आपच्या आमदारांनीसाधला जनतेशी संवाद

0

आम आदमी पक्षाने राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या ‘आप आमदारांशी संवाद’ या अभिनव अशा सार्वजनिक संवाद कार्यक्रमाला राज्यभरातील लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती काल पक्षाने दिली. सांताक्रूझ, पणजी, दोनापावला या भागांसह राज्यातील विविध भागांतील नागरिकांनी प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने आप आमदारांशी थेट संवाद साधून राज्यातील गंभीर प्रश्न आमदारांकडे मांडले. हा कार्यक्रम पक्षाच्या पणजीतील कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कित्येक नागरिकांनी आपल्या कागदपत्रांसह हजर राहून यावेळी आमदारांशी चर्चा केली, तर दूर भागांतील नागरिकांनी लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे सहभागी होत डिजिटल माध्यमातून आपल्या समस्या मांडल्या. या कार्यक्रमात लोकानी मूलभूत नागरी सुविधांचा अभाव, आरोग्य सेवेचा अभाव, भू-रूपांतरांची समस्या, अनियमित पाणीपुरवठा, अमली पदार्थांची तस्करी, वाढती गुन्हेगारी, पोलिसांच्या कामात होणारा वाढता राजकीय हस्तक्षेप, अपघातांची वाढती संख्या, स्थानिक प्रशासनातील भ्रष्टाचार आदीविषयी तक्रार केली. हा उपक्रम आता प्रत्येक तालुक्यात नेण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी दिली. या कार्यक्रमात आमदार व्हेंझी व्हिएगस व क्रूझ सिल्वा यांनी जनतेशी संवाद साधला.