Home बातम्या आसाम भाजपच्याव्हिडिओवरून वाद

आसाम भाजपच्याव्हिडिओवरून वाद

0

आसाममधील भाजपचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा एक व्हिडिओ ‘आसाम भाजपा’ या ‘एक्स’ अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला. पोस्ट करण्यात आलेल्या एआय जनरेटेड व्हिडिओत हिमंता बिस्वा सरमा हे टोपी घातलेल्या दोन व्यक्तींवर रायफल रोखून धरलेल्या स्थितीत दिसत होते. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्यासारखीच एक व्यक्ती टोपी घातलेल्या अवस्थेत व्हिडिओत दिसत होती. दरम्यान, मुस्लिम लोक परिधान करतात तशी टोपी घातलेल्या दोन व्यक्तींवर हिमंता बिस्वा सरमा यांनी रायफल रोखून धरल्याची टीका काँग्रेसने केली आहे. आसाममध्ये या व्हिडिओवरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपवर टीका सुरू झाल्यानंतर ‘आसाम भाजपा’ या ‘एक्स’वरील सोशल मिडिया अकाऊंटवरून वादग्रस्त व्हिडीओ डिलिट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या शेवटी हिमंता यांची प्रतिमा एका ‘हिरो’सारखी दाखवण्यात आली होती. त्याखाली काही वाक्य लिहिण्यात आले होते. बांगलादेशींना क्षमा नाही, तुम्ही पाकिस्तानला का जाता?, विदेशी नागरिकमुक्त आसाम, अशी वाक्ये त्या व्हिडिओच्या शेवटी दाखवण्यात आली होती. काँग्रेसने ‘आसाम भाजपा’ने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर टीका केली आहे. भाजपने पोस्ट केलेला व्हिडिओ खूपच वाईट असून, त्याला एक सामान्य ट्रोल समजून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच सामूहिक हिंसा आणि नरसंहारासाठी हे आवाहन आहे, अशी टीका काँग्रेसने केली.