Home Featured दोन ठिकाणच्या अपघातात दोघांचा मृत्यू

दोन ठिकाणच्या अपघातात दोघांचा मृत्यू

0

बिट्स पिलानीजवळ ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

बिट्स पिलानीच्या गोवा कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रवीण शिरोलकर (32) असे या मृत तरुणाचे नाव असून, तो वास्को येथील बायणा भागात राहत होता. मुळचा कोल्हापूरचा असलेला प्रवीण हा वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील ‘सिप्ला’ कंपनीत कार्यरत होता. कामावर जात असतानाच हा अपघात झाला व त्यात त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण शिरोलकर आपल्या दुचाकीवरून वेर्णाच्या दिशेने जात होता. त्याचवेळी एकाच दिशेने एक ट्रक आणि एक टँकरदेखील प्रवास करत होते. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, ही दोन अवजड वाहने जात असताना प्रवीणने ओव्हरटेक प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो थेट ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने प्रवीणचा जागीच मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर ट्रकचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केले. यामुळे काही काळ महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, काही वेळाने संबंधित ट्रकचालक स्वतःहून वेर्णा पोलीस स्थानकात शरण आला. पोलिसांनी तातडीने ट्रक ताब्यात घेतला आहे. ट्रकचालकाची ओळख समोर आली नसून पोलीस तपास सुरू आहे. वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. वेर्णा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, नेमकी चूक कोणाची होती याचा शोध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घेतला जात आहे.

शिरगाव अपघातात युवक ठार

शिरगाव येथे दुचाकीच्या अपघातात मंथन गोपीनाथ परब (25) मुळगाव या युवकाचा मृत्यू झाला. सदर अपघात रात्रीच्या वेळी झाल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची माहिती काल रविवारी सकाळी उघडकीस आली. एका पाव विक्रेत्याला रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात एक मृतदेह आढळून आल्याने त्याने तात्काळ पोलिसांना त्याबाबतची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आणि त्याची दुचाकी खळीत पडलेली आढळून आली.
सदर अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला असावा, मात्र तो सकाळपर्यंत कोणाच्याही निदर्शनास आला नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास सुरू केला आहे.