Home Featured बेळगावला जाणारे विमान विजयपूरमध्ये कोसळले

बेळगावला जाणारे विमान विजयपूरमध्ये कोसळले

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाची बातमी ताजी असतानाच कर्नाटकातील विजयपूर येथे आणखी एका विमानाचा अपघात झाला आहे. कलबुर्गीवरून बेळगावला जाणारे एक खासगी विमान विजयपूरमधील बबलेश्वर तालुक्यातील मंगळूर गावात कोसळले. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कोसळलेले विमान हे रेड बर्ड कंपनीचे एक खासगी प्रशिक्षण विमान असल्याची माहिती आहे. या अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ही घटना बबलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

कलबुर्गीवरून बेळगावसाठी उड्डाण
अपघातग्रस्त विमान हे विमान कलबुर्गीहून बेळगावला जात होते. उड्डाण केल्यानंतर या विमानात काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला किंवा इंधन संपले आणि हे विमान खाली कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वरजवळ असलेल्या मंगळूरू गावाच्या परिसरातील एका शेतात हे विमान जमिनीवर कोसळले. सुदैवाने या विमानातील प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी हे अपघातात बचावले आहेत.
या अपघातात सहाय्यक फ्लाइट इन्स्ट्रक्टर कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक गौतम संकर हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारांसाठी बीएलडीई रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.

स्थानिकांची मदतीसाठी धाव
वैमानिक प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या रेड बर्ड एव्हिएशन संस्थेचे हे प्रशिक्षण विमान कलबुर्गीहून बेळगावकडे जात असताना अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचवले. सध्या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या विमान अपघाताची माहिती मिळाल्यांतर, ते पाहण्यासाठी गावकऱ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचे दिसत होते.