19 वर्षांखालील पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा 100 धावांनी केला पराभव
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने 19 वर्षांखालील पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर काल भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना रंगला. त्यात भारतीय संघाने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले. प्रथम फलंदाजी करताना भारताने वैभव सूर्यवंशीच्या 175 धावांच्या वादळी खेळीच्या बळावर 411 धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला; पण त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले आणि युवा टीम इंडियाने सहाव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. वैभव सूर्यवंशी हा अंतिम सामन्यातील सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ आणि थॉमस रिव्ह याच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी अपराजित राहिला होता. अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यातील शतकवीर ॲरोन जॉर्ज या महत्वाच्या सामन्यात अवघ्या 9 धावा करून माघारी परतला. पण त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रेने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी मिळून 142 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान आयुष म्हात्रेने 51 चेंडूत 53 धावांची खेळी केली, तर वैभव सूर्यवंशीने अवघ्या 80 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकारांच्या साहाय्याने 175 धावांची खेळी केली. या जोडीने भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. वैभव सूर्यवंशीचे द्विशतक अवघ्या 25 धावांनी हुकले. त्यानंतर वेदांत त्रिवेदीने 32 आणि विहान मल्होत्राने 30 धावांची खेळी केली. शेवटी अभिज्ञान कुंडूने 40 आणि कनिष्क चौहानने नाबाद 37 धावांची खेळी करून संघाची धावसंख्या 9 गडी बाद 411 धावांवर पोहोचवली. इंग्लंडकडून सेबेस्टियान मॉर्गन याने आणि ॲलेक्स ग्रीनने 2, तर जेम्स मिंटो याने 3 गडी बाद केले.
इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 412 धावांचा डोंगर सर करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडलाही सुरूवातीला मोठा धक्का बसला. सलामीवीर जोसेफ मुर्स अवघ्या 17 धावा करून माघारी परतला. त्यानंतर बेन डॉकिन्स आणि बेन मायसने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. डॉकिन्सने 66 धावा केल्या, तर मेयस ने 45 धावा केल्या; पण हे दोघेही मोठी खेळी करू शकले नाहीत. कर्णधार थॉमस रिव्ह याने 31 धावांची झटपट खेळी केली. त्यानंतर आलेल्या कॅलेब फाल्कनरने इंग्लंडचा डाव सावरला. त्याने 67 चेंडूत 115 धावांची खेळी केली. मात्र अन्य फलंदाजांची पुरेशी साथ न मिळाल्याने अखेरीस 311 धावांवर इंग्लंडचा संपूर्ण संघ गारद झाला. भारताकडून अंबरिशने 3, दीपेश आणि कनिष्क यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले. कर्णधार आयुष म्हात्रे आणि खिलन पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
विश्वचषकावर भारताने सहाव्यांदा कोरले नाव
भारतीय संघाने सर्वाधिक वेळा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचा स्वतःचा विक्रम सुधारला आहे. भारत आता सहाव्यांदा विजेता बनला आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांनी चार वेळा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे. भारताने यापूर्वी 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये विश्वचषक जिंकला होता.
वैभव सूर्यवंशीची 175 धावांची वादळी खेळी
अंतिम सामन्यात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. वैभवने अवघ्या 55 चेंडूत वेगवान शतक झळकावले. हे या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले. वैभव या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी राहिला. अंतिम सामन्यात वैभवने 80 चेंडूत 175 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 15 षटकार खेचले.