ग्रंथोत्सवात बहुभाषिक गोव्यावरील परिसंवाद रंगला
भारतीय भाषांमध्ये परस्पर सौहार्द आणि बंधूभाव असून ह्या सर्व भारतीय भाषा मिळूनच एक भारतीय भाषा परिवार बनलेला आहे असे प्रतिपादन नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मिलिंद मराठे यांनी काल पणजीत आयोजित राष्ट्रीय ग्रंथोत्सवातील ‘कोंकणी – मराठी – इंग्रजी : बहुभाषिक गोव्याचे भवितव्य’ ह्या विषयावरील परिसंवादात अध्यक्षस्थानावरून केले. ह्यावेळी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर दैनिक नवप्रभाचे संपादक व साहित्यिक श्री. परेश वासुदेव प्रभू, नामांकित कोंकणी कवी व साहित्यिक श्री. रमेश घाडी परिसंवादात सहभागी झाले होते. ह्या परिसंवादाचे संचालन गोवा विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक डॉ. विनय बापट यांनी
केले.
ह्यावेळी बोलताना श्री. मराठे यांनी भाषा भांडत नाहीत, तर माणसे भांडतात हे सूत्र पकडून सांगितले की गोव्यातील कोकणी व मराठी ह्या दोन्ही भाषांमध्ये भारतीय भाषा म्हणून सलोखा असून हा सलोखा राहिला तरच गोव्याचा विकास होऊ शकेल. नव्या पिढीने, विशेषतः विद्यार्थ्यांनी हे भान नेहमी ठेवावे व आपापल्या भाषेसाठी योगदान द्यावे असे श्री. मराठे म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक श्री. परेश प्रभू यांनी आपल्या भाषणात गोव्याच्या मराठी परंपरेचा आढावा घेताना सांगितले की मराठी भाषा ही गोव्यात बाहेरून आलेली नसून तो गोमंतकाचा आत्मस्वर आहे आणि खरा सृजनशील गोवेकर मराठी व कोकणी ह्या दोन्ही भाषांवर तितकेच प्रेम करतो. ह्या दोन्ही देशी भाषा असून भारतीय भाषा परिवाराची विविधता, आत्मीयता, एकता, एकात्मता आणि भारतीयता हीच ठळक वैशिष्ट्ये आहेत. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी साम्राज्ये विस्तारत असताना कोणीही एकमेकांवर आपल्या भाषा लादल्या नव्हत्या. मात्र, परकीय आक्रमकांनी आपल्या भाषा येथे लादून येथील संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतर मात्र राजकीय कारणांसाठी भाषा भाषांमध्ये कलह निर्माण केले जात आहेत असे ते म्हणाले.
कोकणी कवी रमेश घाडी यांनी आपल्या साहित्यिक वाटचालीविषयी बोलताना सांगितले की आपले शिक्षण मराठी भाषेतूनच झाले असून वाचनही मराठीतून करीत आलो आहे. आपण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मातीतून आपली कविता जन्माला आली आहे व तिची शब्दकळा आपल्या मातृभाषेने आपल्याला दिली आहे. मुलांचे शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे हे त्यांनी सोदाहरण प्रतिपादिले.
सत्राचे संचालन करताना विनय बापट यांनी सांगितले की नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते पाचवीचे अध्यापन केवळ मराठी किंवा कोकणी भाषेतूनच झाले पाहिजे व पालकांनी ही मागणी सरकारपुढे लावून धरली पाहिजे. तरच भारतीय भाषांविषयी नव्या पिढीला प्रेम उत्पन्न होईल. नॅशनल बुक ट्रस्टच्या कॅरोलिना पो यांनी स्वागत केले व पाहुण्यांचा परिचय करून दिला. ह्यावेळी नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मिलिंद मराठे यांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन व्यासपीठावरील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.