- नारायण महाले
21 वे जागतिक मराठी संमेलन (शोध मराठी मनाचा) नुकतेच कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या तीन दिवसीय संमेलनात चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, क्रीडा, पर्यटन, अर्थव्यवस्था, कृषी आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या परदेशांतील तसेच भारतीय मराठी मान्यवरांचा यात सहभाग होता. या संमेलनाचा हा संक्षिप्त आढावा-
जागतिक मराठी अकादमी आणि गोवा कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने 21 वे ‘शोध मराठी मनाचा’ हे जागतिक मराठी संमेलन 9, 10 व 11 जानेवारी 2026 रोजी कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. या तीन दिवसीय मराठी संमेलनात चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, क्रीडा, पर्यटन, अर्थव्यवस्था, कृषी आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या परदेशांतील तसेच भारतीय मराठी मान्यवरांचा यात सहभाग होता.
मराठी भाषेची ओढ, मराठी साहित्य आणि भाषेवर असलेले प्रेम, निष्ठा आणि आपुलकीतून ‘जागतिक मराठी अकादमी’ची स्थापना झाली. यापूर्वी 2008 साली स्व. विष्णू वाघ यांच्या पुढाकाराने जागतिक मराठी संमेलन कला अकादमीमध्ये आयोजित करण्यात आले होते.
‘औक्षण’ आणि पारंपरिक स्वागत
चित्रा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून संमेलनाला येणाऱ्या मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. तसेच पौर्णिमा केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा येथील चंद्रेश गावडे यांच्या ‘घोडेमोडणी’ पथकाने ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा परिधान करून सर्वांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.
चित्रपटातील मराठी माणूस
उद्घाटनपूर्व सत्रामध्ये (दि. 9 जानेवारी) दुपारी ‘चित्रपटातील मराठी माणूस’ या विषयावर सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलाखत सिने पत्रकार ब्रिटिश नंदी (प्रवीण टोकेकर) यांनी घेतली. सुमारे चार दशकांपूर्वी ‘अफलातून’ या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलेल्या आणि आज मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची नाममुद्रा उमटविलेल्या महेश मांजरेकरांचा जीवनपट तसेच सिने सृष्टीतील कार्यकर्तृत्वाचा उलगडा मुलाखतीतून झाला.
‘लक्ष्मीची पाऊले’ या मुलाखत सत्रात गोमंतकीय उद्योजक श्री. अनिल खंवटे, तसेच जर्मनीमध्ये व्यवसाय करून परत भारतात आलेले भरत गीते आणि इंग्लंडवासीय मराठी व्यावसायिक वैभव खांडगे यांच्याशी महेश म्हात्रे आणि संगीता अभ्यंकर यांनी संवाद साधला.
संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी नाथ संस्थान, औसाच्या कलाकारांनी ‘चंद्रभागेच्या तीरावर’ हा पारंपरिक ‘चक्रीभजन’ प्रकार सादर करून वातावरण भक्तिरसाने भारावून टाकले. प्राची कुलकर्णी यांनी चक्री भजनाबद्दल माहिती दिली.
उद्घाटन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा
गोमंतकीय सुपुत्र असलेले ख्यातनाम अणुशास्त्रज्ञ तथा पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा. डॉ. प्रमोद सावंत संमेलनाचे स्वागताध्यक्ष या नात्याने व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर जागतिक मराठी संमेलनाचे कार्याध्यक्ष उदयदादा लाड, सरचिटणीस जयराम साळगावकर, संमेलनाचे कार्यवाह शिवकुमार लाड, गौरव फुटाणे, तसेच सदस्य महेश म्हात्रे, आयोजन समितीचे कार्याध्यक्ष दशरथ परब, सरचिटणीस प्रा. अनिल सामंत, कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर, कार्यवाह तथा दै. ‘नवप्रभा’चे संपादक परेश प्रभू, खजिनदार डॉ. गौतम देसाई, माजी संमेलनाध्यक्ष नामवंत सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे, सिने अभिनेता/दिग्दर्शक महेश मांजरेकर, उद्योजक अनिल खंवटे आणि इतर आयोजन समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी दीप प्रज्वलित करून संमेलनाचा शुभारंभ केला.
संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर म्हणाले की, ‘भाषा ही परस्पर संपर्कासाठी आवश्यक तर आहेच, पण त्याचबरोबर आपल्या आसपासच्या परिस्थितीचे आकलन व त्या अनुषंगाने व्यक्त होण्यासाठीही भाषेची खूप मदत होते. बालशिक्षण व प्राथमिक शिक्षण हे खेळत-खेळत मातृभाषेतून होणे सर्वात श्रेयस्कर. मराठी माणूस अधिक सक्षम व्हायला हवा आणि त्याचे प्रभावक्षेत्र अधिकाधिक विस्तृत व्हायला हवे, हे आपले उद्दिष्ट असायला हवे.’
स्वागताध्यक्ष या नात्याने बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, ‘भाषा, साहित्य, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, समाजकारण आणि मानवी मूल्ये एकत्र येतात तेव्हा जागतिक मराठी संमेलन केवळ स्मरणाचा किंवा गौरवाचा सोहळा न ठरता, समाजजीवनात परिवर्तन व प्रगत विचारांची पायाभरणी करणारे एक प्रभावी व्यासपीठ ठरते. ‘शोध मराठी मनाचा’ ही संकल्पना मराठी भाषेच्या अभ्यासापुरतीच किंवा चर्चेपुरतीच मर्यादित नाही तर एकंदरीत मानवी मूल्यांचा आणि विचारांचा शोध घेणारी आहे. जागतिक मराठी संमेलन मराठी मनाचा सामूहिक संवाद आहे.’
याप्रसंगी उद्योजक अनिल खंवटे यांना ‘जागतिक मराठी भूषण’ पुरस्कार, तसेच सिने दिग्दर्शक व अभिनेता महेश मांजरेकरांना ‘कला जीवन पुरस्कार’ संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच किरण ठाकूर, डॉ. प्रकाश प्रभुदेसाई, डॉ. शिरीष बोरकर, राजेंद्र देसाई, अशोक परब या मान्यवरांचा वेगवेगळ्या क्षेत्रांत भरीव कार्य केल्याबद्दल कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ न शकल्याने त्यांचे, तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, अमेरिकास्थित पहिले मराठी खासदार श्रीनिवास ठाणेकर यांची मनोगते चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली.
रामदास फुटाणे संमेलनाचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले की, ‘नोकऱ्या मागणारे मराठी तरुण नकोत तर नोकऱ्या देणारे मराठी तरुण झाले पाहिजेत. त्यामुळे ऐकणारा तरुण वर्ग असावा. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगात विविध क्षेत्रांत नावलौकिक प्राप्त करणाऱ्या, तसेच जिल्हा परिषदेच्या व अन्य मराठी शाळांमध्ये शिकून आपल्या कर्तृत्वाने त्या-त्या देशांत आपला ठसा उमटविणाऱ्या व आपल्या देशाचा नावलौकिक उंचावणाऱ्या लोकांची प्रगती, त्यांचे अनुभव आपल्या मुलांना कळावेत असा हेतू या संमेलनामागे आहे.’
सरचिटणीस प्राचार्य अनिल सामंत यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात ‘संमेलनाच्या जागरणातून गोवेकरांच्या मराठी राजभाषा चळवळीला अधिक चालना व बळकटी मिळेल’ असा आशावाद व्यक्त केला.
उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ संजीवन अकादमीच्या कलाकारांनी गायिलेल्या नांदीने झाला. सिद्धी उपाध्ये यांनी उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन केले. उद्घाटनानंतरच्या सत्रात गोमंतकीय कलाकारांनी ‘मर्मबंधातील ठेव ही’ हा सवेष नाट्यसंगीताचा कार्यक्रम कलात्मकरीत्या सादर केला. नितिन कोरगावकरांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली होती.
‘मांडवीच्या तीरावर’ अर्थात ‘काव्यजल्लोष’
दुसऱ्या दिवशीच्या (दि. 10 जानेवारी) सकाळच्या सत्राची सुरुवात ‘मांडवीच्या तीरावर’ अर्थात ‘काव्यजल्लोष’ या काव्यसंमेलनाने झाली. काव्यसंमेलन कला अकादमीच्या कृष्णकक्षात आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुस्कर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ‘काव्यजल्लोषा’त महाराष्ट्रातील तसेच गोव्यातील कवी-कवयित्रींनी बहारदार कविता सादर केल्या. गोमंतकीय कवयित्री व लेखिका कालिका बापट यांनी परिश्रमपूर्वक तसेच यशस्वीरीत्या काव्यसंमेलनाचे संयोजन केले. डॉ. महेश केळुस्कर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ‘काव्यजल्लोष’चा रीतसर शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ‘आयएमबी’चे अध्यक्ष दशरथ परब, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष तथा संमेलन आयोजन समितीचे सरचिटणीस प्रा. अनिल सामंत, जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष यशवंतराव पाटील उपस्धित होते.
‘कविता ही कवीला ओळख मिळवून देते. कविता मातीचा सुगंध घेऊनच येते. त्यामुळे गोमंतकीयांनी गोव्याच्या मातीतली कविता लिहावी,’ असे ‘काव्यजल्लोष’चे अध्यक्ष या नात्याने बोलताना डॉ. केळुस्कर म्हणाले.
या संमेलनाच्या ‘बालकविता’ सत्रात गोमंतकीय ज्येष्ठ कवी चंद्रकांत रामा गावस यांच्या बालकविता संग्रहाचे प्रकाशन संमेलनाच्या गोवा कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष तथा ‘आयएमबी’चे अध्यक्ष दशरथ परब यांच्या हस्ते झाले.
समुद्रापलीकडे ः भाग- 1 (सत्र)
‘समुद्रापलीकडे ः भाग- 1′ या सत्रात शैलजा पाईक, माधव गोगावले, डॉ. अनिल देसाई, सई गणबोटे (अमेरिका), ऊर्मिला देवेन (जपान), राहुल उरमकर (केनिया), जीवन करपे (जर्मनी) यांनी आपापल्या क्षेत्रातील अनुभव कथन केले. अभिजित कांबळे तसेच डॉ. पूर्वा वस्त यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा
‘तंत्रज्ञान- दिशा आणि दशा’ या सत्रांतर्गत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा’ या विषयावर डॉ. रामराव वाघ, डॉ. मनोहर चासकर, प्रसाद शिरगावकर यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले. श्रेया टेंगसे यांनी या तिन्ही तज्ज्ञ मान्यवरांची मुलाखत घेऊन त्यांच्याकडून या विषयावरची सविस्तर माहिती जाणून घेतली. तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी नक्कीच होऊ शकतो; मात्र अमर्यादित वापर केल्यास त्यापासून अधिकच तोटे होऊ शकतात असा या परिसंवादाचा एकंदर सूर होता. आधुनिक तंत्रज्ञानामुळे भौतिक प्रगतीला गती आली, पण मूळ संस्कृतीपासून समाज दुरावला, असे मत वक्त्यांनी मांडले.
पर्यटन व सांस्कृतिक बदल
‘पर्यटन व सांस्कृतिक बदल’ या सत्रात पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी दीपक नार्वेकर, धेंपो महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज कामत, ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर सहभागी झाले होते. श्रुती हजारे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. गोवा पर्यटनदृष्ट्या केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरता मर्यादित न ठेवता ‘गोवा बियांड द बिचेस’ (समुद्रकिनाऱ्यापलीकडील गोवा) ही संकल्पना पुढे नेत असून, आध्यात्मिक पर्यटनावर अधिक भर देण्यात येणार असल्याची माहिती दीपक नार्वेकर यांनी दिली. गोव्याच्या प्राचीन सांस्कृतिक वारसाविषयी आध्यात्मिकदृष्ट्या प्रचार होणे गरजेचे आहे, तसेच पर्यटनाच्या गुणवत्तेवरही अधिक भर देणे आवश्यक आहे असे प्राचार्य मनोज कामत यांनी सांगितले. गोव्यात विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने आले तरच पर्यटन क्षेत्राला फायदा होईल. यासाठी सरकारने स्वच्छता, कचरा व्यवस्थापन इत्यादी अत्यावश्यक घटकांकडे गांभीर्यपूर्वक पाहायला हवे, असे किरण ठाकूर म्हणाले.
माध्यमकर्मी आणि जागतिकीकरण
पत्रकारितेची बांधिलकी ही नेहमीच समाजाच्या शेवटच्या घटकाशी असायला हवी, असे प्रतिपादन ‘बीबीसी’चे (मराठी) पत्रकार अभिजित कांबळी यांनी ‘माध्यमकर्मी व जागतिकीकरण’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना केले. गोव्याचे ‘दै. तरुण भारत’चे संपादक सागर जावडेकर व पत्रकार प्रभाकर ढगे हेही चर्चासत्रात सहभागी झाले होते. पत्रकार विजय चोरमारे यांनी वक्त्यांशी संवाद साधला. ‘कॉर्पोरेट जगत आणि सत्ता ज्यांच्या हाती आहे त्यांना सामान्य जनतेच्या वतीने पत्रकारितेने जाब विचारला पाहिजे. माध्यमांनी आपली जबाबदारी नीटपणे पार न पाडल्यास लोकशाही धोक्यात येऊ शकते,’ असे अभिजित कांबळे म्हणाले. पत्रकारांनी लोकशाहीचे पहारेकरी म्हणून भूमिका बजवावी असा एकंदरीत सूर या संवादातून व्यक्त झाला.
मातृभाषा व जागतिकीकरण
कितीही जागतिकीकरण झाले तरी मातृभाषेचे महत्त्व अबाधित आहे. मातृभाषा व जागतिकीकरण या गोष्टी परस्पर पूरक आहेत. जागतिकीकरणामुळे मातृभाषेचा प्रसार होण्यास मदत झाली आहे, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी ‘मातृभाषा व जागतिकीकरण’ या सत्रात व्यक्त केले. या सत्रात दै. ‘नवप्रभा’चे संपादक परेश प्रभू, तसेच कवी अशोक नायगावकर यांनी आपले विचार मांडले. योगेंद्र पुराणिक यांनी चित्रफितीद्वारे आपले मनोगत व्यक्त केले. विजय चोरमारे आणि मंगेश काळे हे या सत्राचे संवादक होते. ‘आपल्याकडे स्थानिक भाषांना बाजूला ठेवून इंग्रजीला जवळ करणे ‘स्टेटस् सिम्बॉल’ बनले आहे’ या मुद्द्यावर परेश प्रभू यांनी विशेष भर दिला. गोव्यात शतकानुशतके मराठी आहे याचे दाखले देत ते म्हणाले की, ‘1526 साली कृष्णदास शामा यांनी ‘श्रीकृष्ण चरित्रकथा’ ग्रंथ लिहिला. पोर्तुगीज सरकारने मराठी शाळांना प्रोत्साहन दिले. मराठी महाराष्ट्रातून गोव्यात आलेली नाही.’ अशोक नायगावकर यांनी देश-विदेशांत मातृभाषा व संस्कृतीत होणाऱ्या बदलांची उदाहरणे देत जागतिकीकरणाचा प्रभाव स्पष्ट केला.
चित्र-काव्य-शिल्प
‘चित्र-शिल्प-काव्य’ यांचा मनोहारी सृजनसंगम या संमेलनात पाहावयास मिळाला. यावेळी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, दशरथ परब, विजय चोरमारे, अंजली ढमाळ, तुकाराम धांडे, वैशाली पतंगे, हर्षदा पुरी, नीलेश खांडेकर, अनिल दीक्षित, भरत जामकर, इंद्रजित धुले, शशिकांत तिरोडकर, प्रकाश होळकर, प्रशांत मोरे, दत्तप्रसाद जोग, चंद्रशेखर गवस, रुझारिओ पिंटो, गुंजन पाटील इत्यादींनी कविता सादर केल्या. या सत्रात गोमंतकीय साहित्यिक कालिका बापट संपादित ‘ज्योतीने तेजाची आरती’ या पुस्तकाचे प्रकाशन कवी अशोक नायगावकर आणि कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाचे कार्याध्यक्ष दशरथ परब याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. श्यामराव देवरे यांची खास उपस्थिती होती. गोमंतकीय चित्रकार संजय हरमलकर तसेच शिल्पकार सचिन मदगे यांनी आपापल्या कलांचे सादरीकरण केले.
शेवटच्या सत्रात रुद्रेश्वर, पणजी निर्मित ‘पालशेतची विहीर’ हे बहुचर्चित नाटक सादर करण्यात आले.
‘सूर-संवाद’ चित्रफीत
तिसऱ्या दिवशीच्या (11 जानेवारी) पहिल्या सत्रात ‘सूर-संवाद’ ही चित्रफीत दाखविण्यात आली. ऑस्ट्रेलिया येथील किरण प्रधानांशी नेपोलियन आल्मेदा यांनी संवाद साधला होता.
समुद्रातील सोने व समुद्रापलीकडे ः भाग- 2
दुसऱ्या सत्रातील ‘समुद्रातील सोने व समुद्रापलीकडे’ या चर्चासत्रात परदेशात कार्यरत असलेल्या मराठी संशोधक, साहित्यिक आणि व्यावसायिकांनी आपले अनुभव मांडले. डॉ. अनिल वळसंगकर (गोवा), किशोर गोरे, शशिकांत पानट (अमेरिका), अनिल नांदेडकर, डॉ. नितीन उपाध्याय (दुबई), चिनार चितळे (न्यूझिलंड) यांनी सहभाग घेतला होता. विजय चोरमारे आणि डॉ. विनय मडगावकर यांनी वक्त्यांशी संवाद साधला. परदेशात राहूनही आपल्या मातीशी, माणसांशी आणि मातृभाषेशी नातं जपणे हा या सत्राचा समान धागा होता.
ट्रम्प ते पुतीन ः जागतिक अर्थव्यवस्था व भारत
‘ट्रम्प ते पुतीन’ या विषयावरील सत्रात वैशाली पतंगे, गिरीश ठकार, अनिल आंबेसकर सहभागी झाले होते. महेश म्हात्रे व डॉ. प्रा. विनय बापट हे त्या सत्राचे संवादक होते. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने भूमिका घेणे हे सर्वच राष्ट्रांमध्ये दिसून येते. राष्ट्रहिताला बाजूला ठेवले तर तात्त्विक भूमिकेला अर्थ राहत नाही. महासत्तांनी उदारीकरणाचा पुरस्कार केला आहे. स्वस्त मनुष्यबळ आणि कौशल्य यादृष्टीने अमेरिका, रशिया, चीन या देशांना भारतीय बाजारपेठ सोयीची राहिली आहे.
भारतावर आता निर्बंध लावणे योग्य नाही याची जाणीव अमेरिकेला होऊ लागली आहे. तरुण पिढी आपला ‘असेट’ राहिला आहे. सोलर, विंड एनर्जी अशा आपल्या स्रोतांचा वापर केला तर त्याबाबत आपण स्वयंपूर्ण होऊ शकतो, असे मत वैशाली पतंगे यांनी व्यक्त केले.
अमेरिकेत मानव संसाधन विकासासाठी लागणारी साधनसुविधा प्रचंड प्रमाणात आहे. अमेरिकेची धोरणे लोकशाही राज्यांना पाठिंबा देतात. चीन संपूर्ण जगासाठी उत्पादने करतो. भारताने त्यादृष्टीने विचार करायला हवा, असे गिरीश ठकार म्हणाले.
देशाच्या बँका सशक्त असतील तर अर्थव्यवस्था सशक्त होईल. तसेच अर्थव्यवस्था सशक्त असेल तर बँका सशक्त होतील. देशाच्या बँका आणि अर्थव्यवस्था परस्परपूरक आहेत. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी जगात शांतता असायला हवी याचीही जाणीव अनिल आंबेसकर यांनी आपल्या विचारांतून करून दिली.
आधारवड
‘आधारवड’ या चौथ्या सत्रात जंगलं वाचविण्यासाठी संघर्ष करणारा पर्यावरणप्रेमी- कोकणपुत्र- ‘रानमाणूस’ प्रसाद गावडे, मये-सिकेरी येथील गोशाळेचे संस्थापक कमलाकांत तारी, तसेच रस्त्यांवर निराधार अवस्थेत जीवन जगणाऱ्या वृद्धांना आधार देणारे संदीप परब यांचे अनुभव ऐकणे हा एक हृदयस्पर्शी क्षण होता.
‘आपल्याला जगवणाऱ्या निसर्गाचा आपण आदर केला पाहिजे. मानवी जीवन वाचवायचं असेल तर बेसुमार जंगलतोडीपासून जंगलं वाचवायला हवीत. आज माणूस एकंदर संवेदनशीलता हरवून बसल्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत चालला आहे,’ असे ‘रानमाणूस’ प्रसाद गावडे यांनी प्रतिपादन केले.
‘आपण आतापर्यंत रस्त्यावर विकलांग, रोगग्रस्त अवस्थेत पडलेल्या लोकांना आधार दिला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला एखाद्या पुरस्कारापेक्षाही मोठा वाटतो,’ असे संदीप परब म्हणाले.
बाबा रामदेवांमुळे आपल्याला गोमाता वाचविण्याची प्रेरणा मिळाली. पतंजलीच्या कार्यकर्त्यांना घेऊन आपण गोसंवर्धनाचे कार्य सुरू केले. गायींची कत्तल होऊ नये म्हणून संघर्ष केला. दोन बेवारस- भटक्या गायी घेऊन सुरू केलेल्या गोशाळेत आज सहा हजार गायी आहेत, तर दिवशाचा खर्च नऊ लाख रुपये आहे, अशी माहिती कमलाकांत तारी यांनी दिली.
या सत्राच्या संवादिका लोकसंस्कृतीच्या अभ्यासक तथा लेखिका पौर्णिमा केरकर यांनी लोकपरंपरेने जपलेली संवेदनशीलता आज हरवलेली आहे याकडे निर्देश करून, या सत्रातील तिन्ही वक्त्यांनी स्वीकारलेल्या व्रतांसाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला, समस्यांना तोंड द्यावे लागले, परंतु त्यांनी आपले कार्य अखंडपणे चालूच ठेवले, याचा आवर्जून उल्लेख केला.
क्रीडांगणावर
‘क्रीडांगणावर’ या सत्रात दोन पद्मश्री क्रीडापटूंनी विशेष रंगत आणली. मल्लखांब खेळाचा प्रसार व प्रगतीसाठी झटणारे पद्मश्री उदय देशपांडे आणि फुटबॉलमधील तरुणांचे प्रेरणास्थान पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर (गोवा) यांची क्रीडा पत्रकार किशोर पेटकर यांनी मुलाखत घेतली. यातून दोघांचा जीवनप्रवास, संघर्ष, यशाचे क्षण श्रोत्यांसमोर उलगडत गेले. खेळाचा सामाजिक परिणाम, नव्या पिढीसमोरील आव्हाने, क्रीडासंस्कृती जपण्याची गरज यावर त्यांनी मनमोकळेपणाने विचार मांडले.
नागराज मंजुळे यांची मुलाखत
समारोपाच्या सत्रात ‘चित्रपटातील सामाजिक आशय’ (‘फॅण्ड्री’ ते ‘खाशाबा’) या विषयावर प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची मुलाखत रंगली. महेश म्हात्रे यांनी त्यांना बोलते केले. ‘आपल्याला स्वतःला व्यक्त करण्यासाठी चित्रपट हे मोठे प्रभावी माध्यम असल्याचे जाणवले. त्यामुळे आपण या माध्यमाकडे वळलो. ‘पिस्तुल्या’ या लघुचित्रपटानंतर आपण आत्मविश्वासाने ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘झुंज’ यांसारखे सामाजिक आशयपूर्ण चित्रपट बनवू शकलो. भारतासाठी पहिले ‘ऑलिम्पिक पदक’ जिंकणारे खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित ‘खाशाबा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समारोप
‘शोध मराठी मनाचा’ ही जागतिक मराठी संमेलनाची संकल्पना मराठी अस्मितेचा, संस्कृतीचा आणि विचारपरंपरेचा गाभा आहे. हा शोध म्हणजे वैभवशाली भूतकाळाचा अभिमान, वर्तमानाचे भान आणि भविष्याकडे आत्मविश्वासाने पाहण्याची प्रेरणा आहे. ‘मराठी मनाचा शोध’ मराठी भाषेला अधिक समृद्ध, सशक्त आणि जागतिक स्तरावर प्रभावी बनवेल असा विश्वास केंद्रीय अक्षय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांनी जागतिक मराठी संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने व्यक्त केला.
याप्रसंगी व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर, नामवंत सिने दिग्दर्शक/निर्माता नागराज मंजुळे, जागतिक मराठी अकादमीचे कार्याध्यक्ष उदयदादा लाड, कार्यवाह गौरव फुटाणे, कोषाध्यक्ष किशोर रांगणेकर, गिरीश ठकार, अशोक पाटील, गोवा आयोजन कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष दशरथ परब, सरचिटणीस प्राचार्य अनिल सामंत, कार्यवाह परेश प्रभू, खजिनदार डॉ. गौतम देसाई तसेच आयोजक संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी सन्माननीय पाहुणे या नात्याने बोलताना सदानंद तानावडे म्हणाले की, ‘गोव्यात मराठी भाषेची दीर्घ परंपरा आहे. कोकणी आमच्या ओठांत असली तरी मराठी पोटात (हृदयात) आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वीरगाथा आम्हाला मराठीने दिली. मराठीमुळे आम्हाला अनेक नाती समजली. आपण राज्यसभेत खासदार या नात्याने मराठीतून शपथ घेतली असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी गोमंतकीयांचे मराठी भाषेशी अतूट नाते असल्याचे सांगितले. स्व. विष्णू वाघ यांच्या पुढाकाराने 2008 साली गोव्यात भरलेल्या जागतिक मराठी संमेलनाचे आपण स्वागताध्यक्ष होतो, याची आठवण त्यांनी याप्रसंगी करून दिली. कार्याध्यक्ष दशरथ परब यांनी स्वागतपर भाषण केले. गौरव फुटाणे यांनी ऋण मानले. यावेळी संमेलन यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेल्या आयोजन समितीच्या तसेच जागतिक मराठी अकादमीच्या पदाथिकाऱ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी चित्र-शिल्प-काव्य सत्रात चित्रकार संजय हरमलकर यांनी रेखाटलेले बा. भ. बोरकर यांचे चित्र आयोजकांना भेट म्हणून प्रदान करण्यात आले.
गोवा मराठी अकादमी, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, गोमंतक साहित्य सेवक मंडळ (पणजी), गोमंत विद्या निकेतन, गोमंतक मराठी अकादमी, बिल्वदल, कोकण मराठी परिषद, साहित्य भारती- गोवा प्रांत, शारदा प्रतिष्ठान या संमेलनाच्या आयोजक संस्था म्हणून कार्यरत होत्या.
संमेलनाचे कार्यवाह शिवकुमार लाड, गौरव फुटाणे, तसेच मुख्य कार्यकारिणीचे सदस्य महेश म्हात्रे या युवा कार्यकर्त्यांनी संमेलनाच्या एकंदरीत आयोजनाची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली.
ओघवत्या शैलीतले सूत्रसंचालन
तीन दिवसीय संमेलनाचे सूत्रसंचालन पुणे येथील ख्यातनाम सूत्रसंचालिका स्नेहल दामले यांनी आपल्या खास ओघवत्या भाषाशैलीत शिस्तबद्धरीत्या केले. त्यांनी आपल्या रसाळ आणि नीटनेटक्या सूत्रनिवेदनाने रसिकांची मने जिंकली.
लक्षवेधी सजावट
मीनानाथ जल्मी यांनी माडाच्या चुडतांपासून केलेली पर्यावरणपूरक व्यासपीठ सजावट, तसेच सभागृहाच्या प्रवेशद्वारावरील माटोळीचे तोरण लक्षवेधी स्वरूपाचे होते.
21 वे जागतिक मराठी संमेलन दीर्घकाळपर्यंत गोमंतकीयांच्या स्मरणात राहील. संमेलनाला गोव्याच्या महाविद्यालयांतील, तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती. गोवा शासनाचे सर्वतोपरी सहकार्य या संमेलनाला लाभले.

