मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून नाव जाहीर; महसूल खात्याकडून तिसरा जिल्हा निर्मितीबाबत अधिकृत अधिसूचना जारी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल अधिकृतरित्या राज्यात तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा केली. तिसऱ्या जिल्ह्याचे नाव ‘कुशावती’ असे केले आहे. या तिसऱ्या जिल्ह्यामध्ये केपे, काणकोण, सांगे, धारबांदोडा या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे येथे उभारण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पर्वरी येथे सचिवालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्य सरकारच्या महसूल खात्याकडून तिसरा जिल्हा निर्मितीबाबत अधिकृत अधिसूचना काल जारी करण्यात आली. तूर्त दक्षिण गोवा जिल्ह्याधिकारी कार्यालयातून नवीन कुशावती जिल्ह्यातील कारभार हाताळला जाणार आहे.
यापूर्वी दक्षिण गोव्यात समाविष्ट असलेल्या काणकोण, केपे, सांगे आणि धारबांदोडा या चार तालुक्यांचा नवीन कुशावती जिल्ह्यात समावेश करण्यात आला आहे. या कुशावती जिल्ह्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत सूचना जारी करण्यात आली आहे. कुशावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिंटस (आयएएस) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दक्षिण गोवा जिल्ह्याधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडेही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
रस्त्यांचे रुंदीकरण करणार
तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मिती प्रक्रियेत त्या भागातील रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. केपे येथून काणकोणला थेट बससेवेची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. धारबांदोडा येथील नागरिकांना आवश्यक वाहतूक सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काणकोण-केपे दरम्यान विशेष
बस सेवा सुरू करणार
काणकोण आणि केपे दरम्यान घाटमार्गे विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. काणकोण आणि केपे यादरम्यान अर्ध्या तासात प्रवास करता यावा यासाठी घाट रस्ते रुंदीकरण करण्याची योजना राबविली जाणार आहे. धारबांदोडा ते केपे यांना जोडणारा जिल्हा रस्ता आणि इतर रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पही लवकरच सुरू होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
27 टक्के लोकसंख्या आदिवासी
कुशावती जिल्ह्यामध्ये सुमारे 27 टक्के लोकसंख्या ही आदिवासी समाजाची असणार आहे. नव्या जिल्हा निर्मितीमुळे त्यांच्यासाठी विविध सरकारी योजना राबविण्यास मदत होणार आहे. सरकारी पातळीवरील नागरिकांची कामे जलदगतीने होण्यास मदत होणार आहे, असेही मुख्यमत्र्यांनी नमूद केले.
तूर्त दक्षिण गोवा
जिल्हाधिकाऱ्यांकडे कारभार
नवीन कुशावती या तिसऱ्या जिल्ह्याची प्रशासकीय संरचना तयार होण्यास वेळ लागणार आहे. कुशावती जिल्ह्यासाठी वेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत, दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून काणकोण, केपे, सांगे आणि धारबांदोडा या चारही तालुक्यांच्या प्रशासनावर देखरेख ठेवतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
चारही तालुक्यांतून वाहते कुशावती नदी
कुशावती ही गोव्यातील पुरातन भौगोलिक वारसा आणि सांस्कृतिक वारसा असलेली नदी आहे. नवीन जिल्ह्यात समावेश चारही तालुक्यांतून कुशावती नदी वाहत असल्याने या नवीन जिल्ह्याला कुशावती असे नाव देण्यात आले आहे. पर्यावरण, जैवविविधता आणि वारसा यांना प्राधान्य देणारा जिल्हा ठरणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
केंद्राची मदत घेणार; कुशावती ‘आकांक्षी जिल्हा’
नवीन कुशावती जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेतली जाणार आहे. नवीन कुशावती जिल्हा हा आकांक्षी जिल्हा म्हणून घोषित केला जाणार आहे. विशेष केंद्रीय निधीसाठी आकांक्षी जिल्हे पात्र आहेत. देशभरात, आकांक्षी जिल्ह्यांना केंद्रित विकासासाठी विशेषतः पायाभूत सुविधाकरिता प्रत्येकी सुमारे 15 कोटी मिळाले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.