गेल्या पाच वर्षांत नऊ लाख भारतीयांनी आपले भारतीय नागरिकत्व त्यागले असून गेल्या काही वर्षांत दरवर्षी सरासरी दोन लाख भारतीय नागरिक आपले नागरिकत्व सोडत आहेत अशी धक्कादायक माहिती नुकतीच संसदेमध्ये सरकारने उघड केली. गोव्यामध्ये हा विषय गेली अनेक वर्षे चर्चेत आहे. ज्यांचा जन्म पोर्तुगीज राजवटीत गोव्यात झाला, त्यांच्या तीन पिढ्यांना पोर्तुगीज नागरिकत्व मिळवण्याची मुभा असल्याने त्याचा फायदा घेऊन पोर्तुगीज पारपत्र मिळवून युरोपीय देशांमध्ये नोकरीव्यवसायासाठी स्थलांतर करणे गोमंतकीयांना, विशेषतः येथील ख्रिस्ती तरुणांना अधिक लाभदायक ठरल्याने आणि भारत सरकार दुहेरी नागरिकत्वास परवानगी देत नसल्याने हजारो गोमंतकीयांनी आपल्या भारतीय पारपत्रावर पाणी सोडले. परंतु हा विषय आता केवळ गोव्यापुरताच उरलेला नाही. भारतीय पारपत्राचा त्याग केलेल्या गोमंतकीयांची मालमत्ता आणि घरे, नातलग गोव्यात असल्याने ओव्हरसिज सिटिजन ऑफ इंडिया दर्जा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न तरी असतो. परंतु भारतीय नागरिकत्वावर पूर्ण पाणी सोडून देऊन परदेशी नागरिकत्व पटकावून तेथे वास्तव्य करणे पसंत करणाऱ्यांची संख्या आता कमालीची वाढू लागलेली दिसते आणि ही विचार करण्याजोगी बाब आहे. सत्तरच्या दशकामध्ये भारतीय बुद्धिमत्ता परदेशांमध्ये चांगल्या नोकरी व्यवसायाच्या इराद्याने जाऊ लागली, तेव्हा त्याला ‘ब्रेन ड्रेन’ संबोधले गेले. हुशार, गुणवत्तावान मुले परदेशांत जाऊन स्थायिक झाल्याने देशाचे किती नुकसान होत आहे ह्यावर तेव्हा चर्चा सुरू झाली. परंतु हे स्थलांतर थांबले मात्र नाही. त्या काळी परदेशात गेलेली मंडळी आज तेथील नागरिकत्व मिळवून तेथील नोकरी व्यवसायांमध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, अगदी राजकारणामध्ये देखील सुस्थिर झालेली दिसते. ते केवळ वंशाने भारतीय उरले आहेत. बाकी तिथलेच झाले आहेत. त्यानंतरच्या काळात चांगल्या जीवनमानासाठी, आर्थिक सुबत्तेसाठी परदेशी जाणाऱ्यांच्या रांगाच लागल्या. शिक्षणासाठी परदेशी गेलेल्या मुलांना तेथील जीवनमान आवडल्याने तेथेच राहण्याकडेही कल वाढला. भारतामध्ये रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याने आपल्या उच्चशिक्षणाला खरा न्याय विदेशात मिळू शकेल असे वाटून परदेशी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ह्या लोकांना तिथले नागरिकत्व घ्यावेसे का वाटते आहे ह्याची अनेक कारणे आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आजकाल प्रत्येक देशामध्ये स्थलांतरितांना दुय्यम दर्जा देण्याकडे कल वाढला आहे. अगदी अमेरिकेपासून सर्वत्र पाहिले तरी आपल्या नागरिकांना सर्वत्र प्राधान्य देण्याची उजवी वृत्ती दिसून येते. त्यामुळे आपण ह्या देशामध्ये उपरे ठरू नये आणि त्याची झळ आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना बसू नये म्हणूनही स्थानिक नागरिकत्व मिळवण्याची अहमहमिका सध्या लागलेली आहे. भारत सरकार दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देत नाही. त्यामुळे एकदा परदेशी नागरिकत्व घेतले की आपोआप भारतीय नागरिकत्व रद्दबातल होते. त्यामुळे ही संख्या मोठी दिसते आहे. भारताचा इतिहास, संस्कृती, परंपरा याचे आपण कितीही गोडवे जरी गायिले तरी जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा तेथील प्रगत जीवनमान, नागरी व्यवहारांतील सुसंस्कृतता, शिस्त, व्यावहारिक पारदर्शकता ह्यांचा नाही म्हटले तरी आपल्यावर प्रभाव पडतोच पडतो. फार दूर कशाला, अगदी थायलंड, सिंगापूर, दुबईसारख्या जवळच्या देशांमध्ये देखील हा फरक नजरेत भरतो. मग अमेरिका, कॅनडा, ब्रिटन ह्यासारख्या प्रगत देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांना आपले नागरिकत्व सोडावेसे वाटले तर त्यात मुळीच नवल नाही. भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्यांमध्ये ह्याच देशांत स्थलांतर केलेल्यांचे प्रमाण मोठे आहे. केवळ चांगल्या नोकरी व्यवसायासाठीच लोक जात आहेत असे नव्हे, तर धनिकवर्गाचेही भारताचे नागरिकत्व त्यागण्याचे प्रमाण मोठे आहे. येथील भ्रष्टाचार, लाचलुचपत, जाचक कर ह्यापेक्षा विदेशी नागरिकत्व घेणे त्यांना सुखकारक वाटत असावे. व्यवसायपरत्वे परदेशांत सातत्याने जाणे येणे करावे लागणाऱ्यांना तर तेथील नागरिकत्व सर्व दृष्टींनी फायदेशीर वाटते. त्यामुळे भारतीय नागरिकत्व त्यागून स्थानिक नागरिकत्व मिळवण्यात त्यांना धन्यता वाटते. गेल्या पाच वर्षांत नऊ लाख भारतीयांना आपले नागरिकत्व सोडावेसे वाटणे हे भारतासाठी आत्मचिंतन करायला लावणारे आहे. आपण इतिहास आणि पुराणांच्या कितीही गमजा मारल्या, तरी प्रगत देशांच्या तुलनेत आपण अजूनही भौतिक विकासाच्याच नव्हे, तर एकूणच जीवनव्यवहाराच्या बाबतीत, जीवनमानामध्ये किती मागासलेले आहोत, हे आपल्या ह्यावरून ढळढळीतपणे लक्षात येते. त्यामुळे ह्यावर मात करण्यासाठी काय काय करायला हवे ह्याचा विचार आपल्याला गांभीर्याने करावाच लागेल.