Home बातम्या जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसच्याजागा अडीच पटीने वाढल्या : प्रदेशाध्यक्ष

जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसच्याजागा अडीच पटीने वाढल्या : प्रदेशाध्यक्ष

0

नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकूण 10 जागा मिळालेल्या आहेत. 2020 साली झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीतील 4 जागांच्या तुलनेत पक्षाने यावेळेस अडीच पट जास्त जागा जिंकल्या आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपला 2020 च्या जिल्हा पंचायत निवडणुकीत 33 जागा मिळाल्या होत्या आणि आता त्यांना 29 जागा मिळाल्या असून, त्यांच्या जागा घटल्या आहेत. काँग्रेस पक्षातून फुटून गेलेल्या आमदारांसह आता त्यांच्याकडे एकूण 33 आमदार आहेत. मात्र, असे असताना त्यांना मागच्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळाल्या असून, 83 टक्क्यांवरून घसरून त्यांची टक्केवारी ही 58 एवढी झाली आहे, असे पाटकर म्हणाले.

याउलट काँग्रेसला 2020 सालच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत फक्त 4 जागा मिळाल्या होत्या. आता 10 जागा मिळालेल्या असून ही वाढ अडीचपट एवढी असल्याचे पाटकर यांनी नमूद केले. दक्षिण गोव्यात काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आहेत, तर पाच ठिकाणी पक्षाचे उमेदवार दुसऱ्या स्थानी आले आहेत. कोलवा येथे पक्षाला अवघ्या 600 मतांनी, तर बार्शे येथे 620 मतांनी हार पत्करावी लागल्याचे पाटकर म्हणाले.

तीन जागा अवघ्या काही मतांच्या फरकाने गमावल्या

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीत पक्षाला शिरसई व हळदोणा ह्या दोन जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत, तर 7 ठिकाणी काँग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानी राहिला. त्यापैकी तीन ठिकाणी पक्षाला अवघ्या काही मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यापैकी एक जागा 253 मतांनी, एक जागा 643 मतांनी, तर एक जागा 770 मतांनी गमवावी लागल्याचे पाटकर म्हणाले.