विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांची काल पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाने मटका व्यवसायाशी असलेल्या त्यांच्या कथित संबंध प्रकरणी सुमारे दोन तास जबानी घेतली. न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर कवळेकर यांनी काल दुपारी १ च्या दरम्यान पोलिसांच्या विशेष चौकशी पथकासमोर हजेरी लावली.
चौकशीवेळी कवळेकर यांनी मटका जुगाराचे साहित्य सापडलेले कार्यालय आपले बंधू बाबल कवळेकर यांचे आहे अशी माहिती क्राईम ब्रॉंचला दिली. यामुळे तपास अधिकार्यांनी बाबल कवळेकर यांना २५ सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स बजावला आहे. बाबू कवळेकर यांना गरज भासल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे. तसेच याप्रकरणी आणखी संशयितांना बोलावून त्यांच्या जबान्या नोंदविण्यात येणार असल्याची माहिती क्राईम ब्रॉंच विभागाचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिली. पोलिसांसमोर हजर राहून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कवळेकर म्हणाले की, आपला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. आपण चुकीचे काहीच केलेले नाही. आपण स्वच्छ असून पोलिसांना सहकार्यही करीत आहे. आपणाला काहीही लपवायचे नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वी कवळेकर यांच्या घरी छापा मारला असता मोठ्या प्रमाणात मटका स्लिप्स, नोंदवही व इतर मटका साहित्य आढळून आले होते. त्यामुळे कवळेकर हे मटका व्यवसायात गुंतल्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. पोलिसांनी हल्लीच बाबू कवळेकर तसेच त्यांची पत्नी सावित्री कवळेकर यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा नोंदविला असून आता बाबू कवळेकर यांच्यावर जुगार कायद्याखालीही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरटीआय कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी मटका जुगार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी खंडपीठाने गुन्हा अन्वेषण विभागाला चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने विभागाने मटका साहित्य जप्त करण्यात आल्यामुळे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांची चौकशी सुरू केली आहे.
कवळेकरांना न्यायालयाचा तूर्त दिलासा
मटका जुगारप्रकरणी सीआयडी पोलिसांनी काल सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश बजावल्यानंतर आमदार व विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. त्यांच्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करीत गुन्हा अन्वेषण विभागाला बाजू मांडण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी सोमवार दि. २५ रोजी ठेवली असून तोपर्यंत कवळेकर यांना अटक करू नये असा आदेश प्रधान न्यायाधीश देशपांडे यांनी दिला. सुनावणी वेळी कवळेकर यांच्या वकिलांनी मटका साहित्य आपले नसून ते कवळेकर यांच्या भावाच्या घरात सापडल्याचे सांगितले. पोलीस आपल्या अशिलाला अडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
विरोधकांचा छळ ः कॉंग्रेस
कॉंग्रेसचे आमदार चंद्रकांत कवळेकर यांना न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. आता कायद्यानुसार कामकाज चालेल. सर्वांत कायदा श्रेष्ठ आहे. पण मुख्यमंत्री विरोधी पक्षाची मटका जुगार प्रकरणी छळ करीत आहे. भाजपाचेच काही नेते मटका बुकी आहेत. त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी केली. गोव्यात मोठ्या प्रमाणात मटका चालतो याची मुख्यमंत्र्यांना माहिती असूनही त्यावर कोणतीही कारवाई न करता गप्प बसणे हा मोठा गुन्हा आहे. गुन्हेगारांचे गुन्हे लपवून ठेवणे म्हणजे लपवून ठेवणारा गुन्हेगार ठरतो, असे नाईक यांनी सांगितले.