हडफडे येथील ‘क्लब बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबला काल मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस आल्वारिस फेरेरा यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही दुर्घटना प्रशासकीय अपयशाचा परिणाम असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक चौकशी करण्याची मागणी त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
हडफड्याच्या सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर नाईट क्लब बेकायदा बांधकामावर सुरू होता. ते बांधकाम पाडण्याची कारवाई होणार होती. मात्र, न्यायालयाकडून स्थगिती मिळवल्यानंतर हा क्लब सुरूच ठेवण्यात आला होता, असे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अंतर्गत चौकशी आदेशावर आमदार फेरेरा यांनी अविश्वास व्यक्त केला आहे. आमदार फेरेरा म्हणाले की, माझा सरकारी चौकशीवर विश्वास नाही. हा केवळ प्रकरण झाकण्याचा प्रकार ठरू शकतो. त्यामुळे या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशीच झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
क्लबला व्यवसाय करण्याची परवानगी कशी मिळाली, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या ठिकाणी बांधकाम परवाना नाही, त्या ठिकाणी व्यवसाय सुरू राहिला कसा? परवानगी कोणी दिली, कोणत्या कागदपत्रांच्या आधारे दिली, याची माहिती जनतेसमोर यायला हवी, असे ते म्हणाले.
या क्लबचे बांधकाम पाणथळ जागेत असल्याचा दावाही त्यांनी केला असून, ते गुगल मॅपवर स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. हे गोव्यातील प्रशासनाच्या अपयशाचे ठळक उदाहरण असल्याची टीकाही त्यांनी केली.