Home Featured पंतप्रधानांच्या हस्ते आज श्रीरामाच्या भव्य कांस्यप्रतिमेचे होणार अनावरण

पंतप्रधानांच्या हस्ते आज श्रीरामाच्या भव्य कांस्यप्रतिमेचे होणार अनावरण

0

>> दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडेकोट सुरक्षा

>> टपाल तिकीट व विशेष नाणे जारी करणार

>> सार्ध पंचशताब्दी महोत्सवाला दिमाखात प्रारंभ

>> पहिल्या दिवशी अलोट गर्दी; भाविकांत उत्साह

पर्तगाळ-काणकोण येथील श्री गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. फलिमारू मठाधीश श्रीमद्‌‍ विद्याधीशतीर्थ स्वामी व पट्टशिष्य श्रीमद्‌‍ विद्याराजेश्वरतीर्थ स्वामी आणि विद्यमान पर्तगाळ मठाधीश श्रीमद्‌‍ विद्याधीशतीर्थ स्वामी यांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू झाला. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (दि. 28) दुपारी 3.15 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मठात आगमन होणार असून, त्यांच्या हस्ते आशियातील सर्वांत उंच आणि भव्य अशा 77 फूट उंचीच्या प्रभू श्रीरामाच्या कांस्यप्रतिमेचे अनावरण होणार आहे. या प्रतिमेचे अनावरण केल्यानतंर पर्तगाळ मठाधीश श्रीमद्‌‍ विद्याधीशतीर्थ स्वामी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मठाचे अनुयायी आणि भाविकांना संबोधित करणार आहेत. दरम्यान, या महोत्सवासाठी गोव्यासह महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकही दाखल झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची, त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी गोवा सरकारने केली असून, स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत आणि मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो हे या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत.

पर्तगाळ मठाजवळ नियंत्रण कक्ष
दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खास पर्तगाळ मठाजवळ नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. काणकोणचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस निरीक्षक यांचा समावेश करून हा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.

विशेष वाहनतळांची सोय
लोलये येथील कळमठ, श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थान, शेळेर येथील सरकारी माध्यमिक विद्यालय, पैंगीण येथील पोटके मैदान, श्री परशुराम मंदिर, हत्तीपावल येथील मोकळे मैदान, पर्तगाळमधील मोकळी जागा, त्याचप्रमाणे मठाच्या परिसरात खास वाहनतळांची सोय करण्यात आली आहे. आणि त्या वाहनतळांपासून खास बसेस, रिक्षांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मठ प्राकारात पोलीस दल, सुरक्षा दल, त्याचप्रमाणे 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अग्निशामक दल आणि अन्य अत्यावश्यक सुविधांचीही सोय करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आढावा बैठका
आतापर्यंत या महोत्सवाच्या आणि पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 4 ते 5 आढावा बैठका घेण्यात आल्या. काल स्वत: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन सर्व तयारीचा आढावा घेतला.

मान्यवरांचा गौरव संपन्न
श्री गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी काल मठ वास्तू आणि एकंदर प्रकल्पासाठी ज्यांनी योगदान दिले, त्यातील जवळजवळ 25 ठेकेदार, अभियंते आणि सेवादारांचा भव्य सत्कार करण्यात आला. श्री जीवोत्तम सभागृहात संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्याला जगद्गुरू श्रीमान मध्वाचार्य मूल महासंस्थान फलिमारू मठाधीश प. पू. श्रीमद्‌‍ विद्याधीशतीर्थ स्वामी महाराज, त्यांचे पट्टशिष्य श्रीमद्‌‍ विद्याराजेश्वरतीर्थ स्वामीजी आणि श्री गोकर्ण पर्तगाळी मठाधीश श्रीमद प.पू. विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

आज रंगणार गायन मैफली
काल पहिल्या दिवशी विविध धार्मिक संपन्न झाले. शुक्रवार दि. 28 रोजी संध्याकाळी 4 ते 5 वाजता बंगळुरू येथील पुतुर नरसिंह नायक यांचा दास वैभव आणि त्यानंतर संध्याकाळी 5.15 ते 6.15 या वेळेत मध्व नारायण मंडपात पं. उपेंद्र भट आणि साथी कलाकारांचा श्रीराम गायन कार्यक्रम आणि जीवोत्तम सभा मंडपात रात्री 8.30 ते 11.30 या वेळेत दिल्ली येथील श्रीराम भारतीय कला केंद्रातर्फे रामलीला नृत्य रुपक नाट्य कार्यक्रम होणार आहे.

पंतप्रधानांच्या आजच्या दौऱ्याचे स्वरूप

पर्तगाळ मठात पंतप्रधानांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार असून, त्यासाठी खास हॅलिपॅड तयार करण्यात आला आहे. पंतप्रधानांचे पहिल्यांदा दाबोळी विमानतळावर आगमन होईल, तेथून ते हेलिकॉप्टरने पर्तगाळ मठात दाखल होतील. पंतप्रधानांचे आगमन झाल्यानंतर लगेचच त्यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्रांच्या भव्य कांस्य प्रतिमेचे अनारवण होईल. यावेळी पोलीस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि अन्य मिळून 25 पेक्षा अधिक वाहनांचा ताफा असेल. पंतप्रधानांच्या हस्ते राम प्रतिमेचे अनावरण, रामायण थीम पार्कचे उद्घाटन, देवदर्शन, विशेष टपाल तिकिट आणि 550 रुपयांच्या विशेष नाण्याचे अनावरण होईल. यानंतर मुख्य सभा होईल. त्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी हे दिल्लीला प्रयाण करणार आहेत.

महोत्सवातील सहभागासाठी पंतप्रधान उत्सुक

पर्तगाळ मठाच्या सार्ध पंच शताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ‘एक्स’वर केलेल्या एका पोस्टमध्ये या कार्यक्रमासाठी आपण उत्सुक असल्याचे म्हटले आहे. 28 नोव्हेंबर हा एक विशेष दिवस आहे; कारण श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापन दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक आहे. यानिमित्ताने प्रभू श्रीरामांच्या 77 फूट उंचीच्या प्रतिमेचेही अनावरण होणार आहे, असे पंतप्रधानांनी सदर पोस्टमध्ये म्हटले आहे.

भारत सरकारकडून 550 रुपयांचे विशेष नाणे

पर्तगाळ मठाच्या सार्ध पंच शताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 550 रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने याविषयीची अधिसूचना काढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पर्तगाळ मठातील सभेवेळी त्या नाण्याचे अनावरण होईल.

श्री प्रभू रामाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापना

पर्तगाळ मठाच्या प्राकारात साकारलेल्या प्रभू रामचंद्रांच्या कांस्यप्रतिमेची काल पर्तगाळ मठाधीश श्रीमद्‌‍ विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या हस्ते शेकडो भाविकांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. काल सकाळी 10.45 वाजता विधिवत पूजेनुसार प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली.

550 रुपयांचे नाणे कसे आहे?
पर्तगाळ मठाच्या सार्ध पंच शताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने जारी केलेले 550 रुपयांचे नाणे हे हैदराबाद टांकसाळीत बनवले आहे.
या नाण्याचे वजन 35 ग्रॅम एवढे आहे.
हे नाणे 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के जस्त आणि 5 टक्के निकेल यांच्या मिश्रणापासून बनले आहे.
या नाण्याच्या एका बाजूला महोत्सवाचे बोधचिन्ह आणि पर्तगाळी जीवोत्तम मठाचे नाव आहे.
हे नाणे हैदराबाद टांकसाळीत विक्रीसाठी ऑनलाईन उपलब्ध असणार असून, त्याची विक्री किंमत 550 रुपये एवढी असेल.