पंतप्रधानांच्या हस्ते उद्या श्रीरामाच्या भव्य प्रतिमेचे अनावरण
मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांची माहिती
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाचे 550 वे वर्ष हा सार्ध पंचशताब्दी महोत्सव एक ऐतिहासिक कार्यक्रम असून या कार्यक्रमाला आज गुरुवारी 27 नोव्हेंबर रोजी प्रारंभ होत असून हा कार्यक्रम रविवार दि. 7 डिसेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. यात धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शुक्रवार दि. 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मठाच्या आवारात उभारण्यात आलेल्या आशिया खंडातील सर्वांत उंच 77 फूट उंचीच्या भगवान श्रीरामाच्या कांस्य धातू पुतळ्याचे लोकार्पण केले जाणार आहे. तसेच, टपाल खात्यातर्फे काढण्यात आलेल्या विशेष तिकिटाचे व अर्थ खात्यातर्फे काढण्यात आलेल्या विशेष नाण्याचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष, उद्योगपती श्रीनिवास धेंपो यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, उद्योगपती शिवानंद साळगावकर, अनिल पै, प्रवास नाईक यांची उपस्थिती होती.
मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवानिमित्त मठाच्या आवारात विविध साधन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या कामासाठी राज्य सरकारकडून सहकार्य मिळाले आहे. राज्यातील भाविक आणि भक्तांनी या महोत्सवाला उपस्थिती लावावी, असे आवाहनही यावेळी मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्री. धेंपो यांनी केले.
मोदींच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. उद्या शुक्रवारी 28 रोजी संध्याकाळी 3.45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मठाच्या आवारात उभारण्यात आलेल्या भव्य 77 फूट उंची असलेल्या श्रीरामाच्या पुतळ्याचे लोकार्पण केले जाणार आहे. हा श्रीरामांचा पुतळा कांस्य धातूचा असून तो तामिळनाडू येथील शिल्पकाराने बनवला आहे. पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर पंतप्रधान मोदी देवदर्शन घेतील. त्यानंतर येथे सभेला संबोधित करणार आहे. या कार्यक्रमासाठी 12 हजार लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी विशेष तिकिटाचे व विशेष नाण्याचे अनावरण केले जाणार आहे, अशी माहिती श्री. धेंपो यांनी दिली.
मठाच्या आवारात 28 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाला राज्य तसेच महाराष्ट्र, कर्नाटक व इतर भागांतील सुमारे दीड ते दोन लाख लोकांची उपस्थिती लाभण्याचा अंदाज आहे. महोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत दररोज साधारणपणे सात ते दहा हजार नागरिकांची उपस्थिती लाभेल, अशी अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.
550 कोटी रामनाम जप
या महोत्सवानिमित्त 550 कोटी श्रीराम नाम जपाचा संकल्प पूर्णत्वास नेण्यात आला आहे. संपूर्ण देशातील मठ, स्वामी आणि अनुयायी यांनी हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. पणजीच्या श्रीमहालक्ष्मी देवस्थानाने 7.5 कोटी रामनाम जपाचे संकल्प पूर्ण केला आहे. श्री महालक्ष्मी देवस्थानाला 5 कोटी रामनाम जप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. भाविक आणि भक्तांची सहकार्यातून रामनाम जपाची उद्दिष्टपूर्ती करण्यात आली आहे, असेही श्री. धेंपो यांनी सांगितले.
या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाला श्री पालिमारू मठाधीश परमपूज्य श्रीमद विद्याधीशतीर्थ स्वामीजी, पट्टशिष्य श्रीमद विद्यराजेश्वरतीर्थ स्वामीजी, श्री संस्थान गौडपादाचार्य कवळे मठाधीश श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामीजी आणि श्री चित्रापूर मठाधीश श्रीमद् सयोक्त शंकराश्रम स्वामीजी उपस्थित राहणार आहेत.
मठाच्या इतिहासात प्रथमच 24 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत सात दिवसांचा भजनी सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या दुसऱ्या वर्धापनदिनाशी जोडला आहे, असेही अध्यक्ष धेंपो यांनी सांगितले.
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाने समाजाच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले असून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सेवांद्वारे मठाने अनुयायी तसेच सर्वसामान्य जनतेला आधार दिला आहे. मागील अनेक दशकांत मठाने विविध मठ, मंदिरे, हॉस्टेल्स, वृद्धाश्रम आणि शाळा उभारून समाजकार्याची परंपरा जपली आहे. हुबळी, पनवेल आणि बंगळूर येथे नवीन विद्यार्थिनी वसतिगृहे, वृद्धाश्रम तसेच पनवेलमधील विद्या दृष्टी ट्रस्टची आधुनिक शाळा ही मठाच्या सेवाकार्यातील अलीकडचे उपक्रम आहेत, असे अध्यक्ष श्री. धेंपो यांनी सांगितले.
गोकर्ण पर्तगाळी मठाचे 550 वर्षातील कार्य अभिमानास्पद आहे. या मठाच्या आवारात साधन सुविधा उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहकार्य केले आहे. स्वामींच्या निमंत्रणाला मान देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला येत आहेत, असे सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.
10 दिवसांत 550
हवनांचा संकल्प
मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवानिमित्त दहा दिवसांत प्रत्येक दिवशी 55 हवने केली जाणार असून एकूण 550 हवनांचा संकल्प पूर्ण केला जाणार आहे. 7 डिसेंबर रोजी महापूर्णाहुती कार्यक्रम होणार आहे, असे शिवानंद साळगावकर यांनी सांगितले.
दरम्यान पंतप्रधानांच्या आगमनासाठी पर्तगाळी येथे एकाच ठिकाणी तीन हेलिपॅड उभारण्यात आली आहेत. काल दि. 26 रोजी या ठिकाणी हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरविण्यात येऊन सराव करण्यात आला.
नामांकित कलाकारांच्या
कलांचे सादरीकरण होणार
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिकांसह देशभरातील नावाजलेले कलाकार आपली कला सादर करतील. यात अनुप जलोटा, शंकर महादेवन, अमृता शणॉय, महेश काळे, बिहार विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवजून आलेल्या मैथिली ठाकूर आदींचा समावेश आहे. तसेच गोव्यातील कलाकारांचे कार्यक्रमसुद्धा यावेळी होणार आहेत, अशीही माहिती श्री. धेंपो यांनी दिली.
रामायण थीम पार्क
मठाच्या आवारात 10 हजार चौ. फूट क्षेत्रफळात रामायण थीम पार्क साकारले जात आहे. भगवान श्रीरामांच्या आदर्शांचे दर्शन घडवणारे विविध विभाग, टपाल तिकिटांचे प्रदर्शन, प्राचीन नाणी, विजयनगर साम्राज्यातील चित्रशैली यांचाही समावेश आहे. हा मठ पर्यटकांचे आकर्षण बनणार आहे, असेही श्री. धेंपो यांनी सांगितले.
काणकोणातील शैक्षणिक
संस्थांना उद्या खास सुट्टी
श्री गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या सार्ध पंच शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या 77 फूट उंचीच्या भव्य आणि आकर्षक अशा श्री प्रभू रामाचंद्रांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमााया वेळी वाहतुकीवर कसलाच परिणाम होऊ नये म्हणून उद्या शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी काणकोणच्या सर्व शैक्षणिक संस्थांना शिक्षण खात्याने सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे 28 रोजी काणकोण तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी काढला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.