संशयित ओडिशातील, मुंबईतून जेरबंद
गेल्या आठवड्यात बायणा वास्कोत घडलेल्या दरोड्याच्या घटनेचा छडा लावत पोलिसांनी या घटनेतील सहा संशयितांना मुंबईतून अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यापैकी बहुतेक जण ओडिशाचे आहेत. पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी संशयितांना मंगळवारी अटक केले असून काल बुधवारी त्यांना गोव्यात आणण्यात आल्याची माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी चोरीच्या मालमत्तेचा मोठा भाग जप्त केला आहे.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, पोलीस टोळीतील प्रत्येक सदस्याचा शोध घेत असून उर्वरित गुन्हेगारांना लवकरच पकडले जाईल असे सांगितले. या सशस्त्र दरोड्यामागे 7 ते 8 जणांचा हात होता. ही घटना 18 नोव्हेंबर रोजी पहाटे बायणा येथील चामुंडी आर्केड येथील सहाव्या मजल्यावरील 60 वर्षीय सागर नायक यांच्या फ्लॅटमध्ये घडली होती. यावेळी या टोळीने सुमारे 45 लाख किमतीची रोख रक्कम, सोने आणि चांदीच्या वस्तू घेऊन पळ काढला. सदर संशयित बंगल्यात आत जाताना आणि बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. हल्ल्यादरम्यान, सागर नायक यांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रॉडने मारहाण केली. त्यांच्या पत्नी हर्षा, त्यांची 12 वर्षांची मुलगी आणि वृद्ध सासू यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांना बांधून ठेवण्यात आले होते.
दरोडेखोरांना फ्लॅटची आणि परिसराची पूर्ण माहिती होती. त्यांनी दाराऐवजी खिडकीची काच फोडून प्रवेश केला, तसेच तिजोरीची माहिती असल्याने आणि नायक यांच्याच कारमधून पळ काढल्याने, हे कृत्य परिचितांचेच असावे, असा पोलिसांचा कयास होता. या अनुषंगाने पोलिसांनी नायक यांच्याशी संबंधित चाळीसहून अधिकजणांची चौकशी केली होती.
वास्कोचे पोलीस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांनी, या संदर्भात चौकशी व शोधासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली आणि त्यांना ओडिशा, महाराष्ट्र आणि बंगळुरू येथे पाठवण्यात आले. तिथे त्यांनी 5 दिवस तळ ठोकला होता. आरोपींना कळू न देण्यासाठी जास्त माहिती उघड करण्यात आली नाही. सर्व आरोपी ओडिशाचे होते आणि त्यांना ओडीसा व महाराष्ट्रात पकडण्यात आले असल्याची माहिती दिली.