बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी पथकाने (एसीबी) गुन्हा नोंदवून कार्यालयांची तपासणी केल्यानंतर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. गुन्हा अन्वेषण पोलिसांच्या एका पथकाने काल बेतूल येथील त्यांच्या एका कार्यालयावर मारलेल्या छाप्यात पोलिसांना मटक्याच्या हजारो स्लिप्स व बूक सापडले आहेत. मटक्याच्या स्लिप्स सापडलेले कार्यालय कवळेकर यांचा बंगला असलेल्या जागेत आहे. याप्रकरणी श्री. कवळेकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मटका जुगारप्रकरणी चौकशी करणार्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने काल पोलीस निरीक्षक विश्वेश कर्पे यांच्या नेतृत्वाखाली हा छापा मारला. पोलिसांनी हजारो मटका स्लिप्स, काही महत्त्वाची कागदपत्रे तसेच नोंदवही कार्यालयातून जप्त केली आहे. कार्यालयात मोठ्या प्रमाणात मटका स्लिप्स व अन्य साहित्य सापडले असल्याने या कार्यालयातून कोणतरी व्यक्ती मटका व्यवसायाची सूत्रे चालवित होती असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी बाबू कवळेकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकार्यांनी सांगितले. सध्या जप्त केलेल्या मटका स्लिप्स प्रकरणी कोणावरही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. मात्र, जप्त केलेल्या साहित्याशी बाबू यांचा संबंध आहे का याची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या शनिवारी भ्रष्टाचारविरोधी पोलिसांनी (एसीबी) बाबू कवळेकर यांच्या बेतूल येथील घरावर तसेच केपे व मडगाव येथील कार्यालयांवर छापे मारले असता पोलिसांना ह्या कार्यालयाविषयीची कुणकुण लागली होती. त्या पार्श्वभूमीवर गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने ह्या कार्यालयावर छापा मारण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेऊन काल ही कारवाई केली. गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वेश कर्पे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी छापा टाकला. कार्यालयाची कसून तपासणी केल्यानंतर त्यांना आतमध्ये हजारो मटक्याच्या स्लिप्स, संबंधित कागदपत्रे व नोंदवही सापडली. झाडाझडतीनंतर सदर सर्व साहित्य त्यांनी जप्त केले.
पोलीस पथकाने कार्यालयाला सील ठोकले असून ह्या कार्यालयात सापडलेल्या हजारो मटका स्लिप्स, नोंदवही तसेच अन्य साहित्य जप्त केले आहे. ह्या कार्यालयातून बाबू कळवेकर हे मटका व्यवसाय चालवीत असल्याचे सिद्ध झाले तर बाबू कवळेकर यांच्यावर जुगारासंबंधीचा गुन्हाही नोंद केला जाऊ शकतो.
शनिवारी भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या पोलिसांनी बाबू कवळेकर यांच्या बेतूल येथील बंगल्यावर तसेच मडगाव, केपे येथील कार्यालयावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी छापे टाकले होते. ह्या छाप्यात कवळेकर यांच्याकडे ४.७५ कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे आढळून आले होते. त्यासंबंधी भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या पोलिसांचा तपास चालू आहे. आज कवळेकर यांच्यावर मटका प्रकरणीही गुन्हा नोंद होऊ शकतो, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, ऑक्टोबर २०१५ मध्ये गुन्हा अन्वेषण विभागाने मटका जुगार प्रकरणी राजकारणी, अज्ञात मंत्री, पोलीस अधिकारी, गुजरातस्थित मटका चालक आणि एजंटविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. मटका व्यवसाय प्रकरणी काशिनाथ शेट्ये यांनी दाखल केलेल्या स्वेच्छा याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पोलिसांना आदेश दिल्यानंतर एफआफआर नोंदवण्यात आला होता.