Home Featured ‘ओला’ला दणका; दुचाकी विक्रीवर बंदी

‘ओला’ला दणका; दुचाकी विक्रीवर बंदी

0

वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वाहतूक खात्याचा मोठा निर्णय; व्यवसाय प्रमाणपत्र व वाहन नोंदणीला देखील स्थगिती

ग्राहकांच्या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वाहतूक खात्याने ‘ओला’ कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. याशिवाय वाहतूक खात्याकडून ओला कंपनीचे व्यवसाय प्रमाणपत्र (टीसी) आणि वाहन पोर्टलवरील ऑनलाइन नोंदणी देखील तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. स्थगिती उठेपर्यंत कंपनीला राज्यात नवीन वाहनांची विक्री करता येणार नाही. ग्राहकांच्या सर्व समस्यांचे निराकरण झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती वाहतूक खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने काल दिली.

वाहतूक खात्याकडून ओला इलेक्ट्रिक कंपनीला नोटीस जारी केली जाणार आहे. तसेच, ओला दुचाकी ग्राहकांना ग्राहक मंचाकडे तक्रारी करण्यासाठी साहाय्य केले जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

राज्यात ओला इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केलेल्या ग्राहकांना कंपनीकडून विक्रीनंतर चांगली सेवा मिळत नाही. नादुरुस्त दुचाकींची दुरुस्ती वेळेवर केली जात नाही. ग्राहकांना दुचाकीच्या दुरुस्तीसाठी हेलपाटे घालावे लागतात, अशा असंख्य तक्रारी आहेत.

सेवा अत्यंत खराब : धर्मा नाईक
ओला कंपनीची वाहन विक्रीनंतरची सेवा अत्यंत खराब आहे. राज्यात कंपनीचे आवश्यक साधनसुविधा असणारे सर्व्हिस केंद्र नाही, दुरुस्तीसाठी अनुभवी तंत्रज्ञ नाहीत, वाहनाचे सुट्टे भाग देखील वेळेवर उपलब्ध होत नाहीत. वाहन खराब झाल्यास किमान सहा ते आठ महिने तरी पुन्हा मिळत नाही. कंपनीच्या वेर्णा येथील सेवा केंद्रात किमान 800 ते 1000 गाड्या दुरुस्तीविना पडून आहेत, असे एक ग्राहक धर्मा नाईक यांनी
सांगितले.

ग्राहकांना मनस्ताप : अजित परब
केंद्र आणि राज्य सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी प्रोत्साहन देत आहे. सरकारकडून त्यासाठी अनुदान देखील दिले जात आहे. त्यामुळे नागरिक नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे आकर्षित होत आहे. मात्र ओला इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केलेल्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ओला कंपनीकडून सुरुवातीला राज्यातील विविध भागांत सेवा केंद्रे सुरू केली होती. तथापि, ती सेवा केंद्रे बंद करून केवळ वेर्णा येथे एक केंद्र सुरू ठेवले आहे. त्यामुळे ओला दुचाकीची खरेदी केलेल्या ग्राहकांना योग्य सेवा मिळत नाही. सध्या वॉरंटीमध्ये असणारी वाहने देखील दुरुस्तीविना पडून आहेत. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर ओला कंपनीने वेर्णा येथील सेवा केंद्रात दुचाकी दुरुस्तीच्या कामाला सुरूवात केली आहे, असे अजित परब यांनी सांगितले.
दरम्यान, देश पातळीवरही ओला कंपनीविरोधात असंख्य ग्राहकांनी तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारने नोटीस जारी करत कंपनीकडून उत्तर मागितले होते.

ग्राहकांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते निवेदन
25 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांची भेट घेत ओला दुचाकीच्या ग्राहकांनी एक निवेदन त्यांना सादर केले होते. त्यात सध्याच्या नादुरुस्त दुचाकींची दुरुस्ती झाल्याशिवाय गोव्यात ओला दुचाकींची विक्री बंद करावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी प्रकरणात लक्ष घाल्याचे आश्वासन दिले होते.

अधिकाऱ्यांची ग्राहकांशी चर्चा
काही दिवसांपूर्वीच ओला इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केलेल्या ग्राहकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना एक निवेदन सादर करून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदार ओला ग्राहकांना वाहतूक खात्याच्या कार्यालयात बोलावून घेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी काल जाणून घेतल्या. यावेळी 100 पेक्षा जास्त ओला दुचाकी ग्राहकांची उपस्थिती होती.