रवी नाईक यांचे आकस्मिक निधन सर्वांसाठीच धक्कादायक होते, परंतु नाईक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही होण्याआधी त्यांच्या पश्चात् फोंड्याची उमेदवारी कोणाला ह्याविषयीची राजकीय चर्चा सुरू झाली हे त्याहून धक्कादायक होते. एखादा मोठा नेता आपल्यातून निघून गेल्यावर पोकळी निर्माण होते हे खरे. रवी नाईक यांच्या जाण्याने गोव्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे हेही खरे, परंतु त्यांच्याविषयी ढाळली जाणारी आसवे अजून सुकलीही नसतील, तो त्यांच्या जागेवर कोण, हा प्रश्न काहींनी आगंतुकपणे पुढे आणला आणि अगदी अंत्यसंस्कारसमयीही आपापले म्हणणे पुढे दामटले हे म्हणजे मृताच्या टाळूवरच्या लोण्यावर हक्क प्रस्थापित करण्यासारखे होते. एकाएकी जेव्हा अशी जागा रिक्त होते, तेव्हा पोटनिवडणुकीसाठी सहा महिन्यांची मुदत निवडणूक आयोगाने दिलेली असते. त्यामुळे रवींनंतर कोण ह्या प्रश्नाचा विचार करायला भरपूर वेळ उपलब्ध होता. त्यामुळे निधनाच्या दिवसापासूनच रवींनंतर कोण हा वितंडवाद घालणे हे अतिशय असंवेदनशील स्वरूपाचे आणि अपरिपक्वतेचे निदर्शक होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्या दिवशी संपूर्ण दिवसभर फोंड्यात होते. परंतु त्यांनी किंवा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी रवींच्या उत्तराधिकाऱ्याबाबत त्या दिवशी अवाक्षर न काढण्याची परिपक्वता दाखवली. मात्र, इतर अनेक नेत्यांना ते भान राहिले नाही. रवींचा राजकीय वारसा रवींनी स्वतःच आपल्या हयातीत आपल्या दोघा मुलांकडे सुपूर्द केलेला आहे. मनोहर पर्रीकर यांना आपली मुले राजकारणात आलेली नको होती. मात्र, त्यांच्या पश्चात् उत्पल पर्रीकर यांना राजकारणात रस असल्याचे दिसून आले. रवींच्या बाबतीत तसे नव्हते. त्यांना आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात आणून आपल्या मागून आपला पाच दशकांचा राजकीय वारसा त्यांच्याकडे सुपूर्द करायचा होता आणि रॉय आणि रितेश ह्या त्यांच्या दोन्ही मुलांनाही राजकारणात रस होता. त्यामुळे नगरसेवकपदापासून त्याची सुरूवात रवींच्याच पुढाकारातून झाली होती. आता प्रश्न येतो तो रवींनंतर त्यांच्या जागी कोण? रवी नाईक हे भाजपवासी झालेले होते, त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेला राजकीय वारसा पुढे आणण्याची नैतिक जबाबदारी भाजपवर आली आहे. भाजपसाठी अनेक कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे फोंड्यात खस्ता खाल्ल्या, परंतु आता पोटनिवडणुकीसाठी त्यांचा विचारही भाजप करू शकत नाही, कारण रवी यांच्या जागी रवींचा मुलगाच हवा अशी मागणी जोरकसपणे पुढे आलेली आहे. त्यामुळे रितेश की रॉय एवढीच निवड करण्याची संधी भाजपपुढे आहे. रॉय यांच्यापेक्षा रितेश यांच्या नावाला सर्वांची अधिक पसंती दिसते. ह्यामध्ये अर्थात सर्वांत महत्त्वाची भूमिका ठरेल ती मगो पक्षाची. मगो आज भाजपाचा मित्रपक्ष आहे. गेल्या निवडणुकीत तो तसा नव्हता. दोन्ही पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले होते. 2022 च्या निवडणुकीत फोंड्यात मुख्यत्वे तिरंगी लढत झाली होती. काँग्रेसचे राजेश वेरेकर, मगोचे केतन भाटीकर आणि भाजपचे रवी नाईक यांच्यात विलक्षण चुरस होती. रवी नाईक त्या निवडणुकीत जवळजवळ पराभूत होत आले होते. अवघ्या 77 मतांची निसटती आघाडी घेऊन त्यांनी तेव्हा ती जागा राखली. काँग्रेसला 6838 मते, मगोला 7437 मते, तर भाजपला 7514 मते एवढ्या निकटची ती लढत झाली होती. भाजपच्या 29.12 टक्के मतांच्या तुलनेत मगोपाशी फोंड्यात 28.82 टक्के मते असल्याचे त्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले होते. त्यामुळे आता रवी नाईक यांचा फोंड्याच्या राजकीय क्षितिजावरून अस्त झालेला असताना, मगो पक्ष तेथे आपले स्थान अधिक बळकट करण्याचे सोडून भाजपला आयत्या बिळावर नागोबा होण्याची संधी मिळवून देईल का ह्याबाबत खरोखरच साशंकता आहे. मगो पक्षाची धुरा हाती आल्यापासून ढवळीकर बंधूंनी केवळ मोजक्या मतदारसंघांपुरतेच पक्षाचे काम सीमित ठेवले आहे. त्यांना राज्यव्यापी विस्तार करण्याची संधी होती तेव्हाही त्यांनी ती मेहनत घेतली नाही. सध्या रवी नाईक यांच्या निधनाची जखम ताजी आहे. त्यामुळे मगोने अद्याप आपले खरे पत्ते बाहेर काढलेले नाहीत. पोटनिवडणूक घोषित होईल तेव्हा मगोची भूमिका काय राहील आणि फोंड्याची जागा भाजपसाठी सोडायच्या बदल्यात कोणता समझोता केला जाईल हे महत्त्वाचे असेल. रवी नाईक यांच्या पश्चात् फोंड्याची जागा टिकवण्याएवढा रवींचा वारसा तेथे कायम आहे का हे आगामी पोटनिवडणुकीतून दिसून येणार आहे. सध्या सहानुभूतीची लाट कायम आहे, परंतु जसजसे दिवस जातील, तशी ती निवडणुकीत निरुपयोगी ठरत जाईल हेही तितकेच खरे. रवींसारखा समाजाच्या तळागाळाशी कायम नाते टिकवणारा उत्तुंग नेता होणे ही तशी सोपी गोष्ट नाही. तो वारसा खरेच दिसेल काय?