Home Featured देश मोठा की क्रिकेट?

देश मोठा की क्रिकेट?

0

आशिया कप स्पर्धेच्या क्रिकेट सामन्यामध्ये भारताने अखेर पाकिस्तानवर सात गडी राखून दणदणीत विजय प्राप्त केला. मात्र, ह्या विजयापेक्षा सध्या अधिक चर्चा रंगली आहे, ती सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याची. भारतीय खेळाडूंनी ‘खिलाडूवृत्ती’ न दाखवल्याचा आरोप करीत आता पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापकाने आशियाई क्रिकेट मंडळाकडे रीतसर तक्रार वगैरे दाखल केली आहे. ज्या पाकिस्तानने पहलगाममध्ये दहशतवादी पाठवून 26 निरपराध भारतीयांना त्यांच्या बायकामुलांसमक्ष ठार मारले, ज्या पाकिस्तानानने भारतीय प्रदेशात शेकडोंच्या संख्येने द्रोनहल्ले चढवण्याचा प्रयत्न केला, ज्या पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर सतत प्रचंड गोळीबार चालवून निरपराध्यांचे रक्त सांडले, त्या देशाच्या संघाच्या खेळाडूंशी खिलाडूवृत्तीने वागण्याची अपेक्षा मुळात बाळगता येईल काय? खरे तर सद्यपरिस्थितीत पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याचा सरकारने आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेला निर्णयच बहुसंख्य भारतीयांना रुचलेला नाही. ज्या प्रकारे समाजमाध्यमांवर गेले काही दिवस टीकेची झोड उठली आहे, ती तीव्र जनभावना बोलकी आहे. दोन्ही देशांमधील संबंध पराकोटीचे बिघडलेले आहेत, व्यापार बंद आहे, वाहतूक बंद आहे, व्हिसा बंद आहेत, पाणी रोखण्याची भाषा केली जाते आहे, अशा वेळी क्रिकेटपटूंनी त्यांना गळामिठ्या का मारायच्या? ह्या सामन्यामध्ये भारतीय संघ खेळला नसता तर त्याच्यावर आंतरराष्ट्रीय निर्बंध येऊ शकले असते वगैरे वगैरे लाख कारणे ह्या सामन्याच्या समर्थनार्थ पुढे केली गेली. आता सामना खेळून हस्तांदोलन न करून जो काही निषेध व्यक्त केला गेला आहे, तोही कारवाईलाच आमंत्रण देणारा आहे. परंतु सामना खेळून हस्तांदोलन न करण्याचा देखावा करण्यापेक्षा हा सामना टाळण्याचे रीतसर प्रयत्न झाले असते तर ते अधिक शोभून दिसले असते. नाणेफेकीपूर्वी भारतीय कप्तानाने पाकिस्तानी कप्तानाशी हस्तांदोलन न करणे, नाणेफेक करवणाऱ्या रवी शास्त्रींनी देखील हस्तांदोलन टाळणे, सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करता ड्रेसिंगरूमचा दरवाजा बंद करणे आणि माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत हा विजय पहलगाममध्ये शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांना आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्यांना समर्पित करण्यात येत असल्याचे सांगणे ह्या सगळ्यातून भारतीय जनभावनेपासून आम्हीही अलिप्त नाही हे ठसवण्याचा प्रयत्न जरी झाला असला, तरी ‘बूँदसे गयी वो हौद से नही आती’ हेही तितकेच खरे आहे. समजा ह्या सामन्यात भारत हरला असता तर? क्रिकेट आणि राजकारण ह्या वेगळ्या गोष्टी आहेत, वगैरे तारे केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी नुकतेच तोडले. समजा देशात काँग्रेसचे शासन असते आणि त्यांनी हा निर्णय घेतला असता, तर भाजपने ह्या विषयावरून आकाशपाताळ एक केले असते. भारत आणि पाकिस्तान दरम्यान ह्यापूर्वी जेव्हा जेव्हा तणाव निर्माण झाला, तेव्हा त्याविरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यांच्या शिवसैनिकांनी क्रिकेटची पीच खोदून सामना बंद पाडल्याची पूर्वीची उदाहरणे आहेत. शेवटी खेळापेक्षा देश मोठा असतो. देशाचा स्वाभिमान मोठा असतो. विद्यमान केंद्रीय गृहमंत्र्यांचे पुत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत. केवळ ते अडचणीत येऊ नयेत ह्यासाठीच सरकारने ह्या क्रिकेट सामन्याबाबत मवाळ भूमिका घेतल्याची टीका विरोधकांनी चालवली आहे. उद्धवसेनेने तर ह्या निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्रात सिंदूर आंदोलन चालवले. आप नेते केजरीवाल यांनी ट्रम्प यांच्या दबावामुळे हा सामना खेळवला गेला का असा सवाल केला आहे. शिवसेनेच्या संजय राऊतांपासून एमआयएमच्या असदुद्दिन ओवैसींपर्यंतचे नेते सुरांत सूर लावून बोलताना प्रथमच दिसले. विरोधकांचे सोडा, त्यामागे त्यांची राजकीय गणिते असतील, परंतु आम भारतीय तरुणाईच्या मनामध्येही ह्या निर्णयाबाबत तीव्र रोष होता. त्यामुळे दुबईचे जेमतेम पंचवीस हजार क्षमतेचे स्टेडियमदेखील भारत – पाकिस्तान सामना असूनही बरेच रिकामे दिसले. असंख्य क्रिकेट चाहत्यांनी हा सामना टीव्हीवर पाहायचेही टाळले. पहलगाममध्ये जे काही घडले, त्याने देशभरातील भारतीय तरुणाईदेखील दुखावलेली आहे आणि ती ह्या निर्णयाविरुद्ध प्रखरपणे मत मांडताना दिसत आहे. भारत पाकिस्तान क्रिकेट ही काहींसाठी कमाईची संधी असते. कोट्यवधींची सट्टेबाजी ह्या सामन्यावर चालते. आयोजकांची आणि प्रायोजकांचीही चांदी असते. त्यामुळेच ह्यामध्ये अनेकाचे हितसंबंध दडलेले असतात. परंतु क्रिकेट मोठे की देशाचा स्वाभिमान मोठा ह्याचे उत्तर कोणी द्यायचे?