सुशीला कार्कींना एका गटाचा विरोध
नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र या सरकारचे नेतृत्व कोण करणार, याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव या शर्यतीत आघाडीवर होते. परंतु आता कुलमान घिशिंग हे अंतरिम पंतप्रधान होण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे.
नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जेन-झी आंदोलनानंतर अखेर राजकीय बदलांची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर अंतरिम सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
कुलमान घिशिंग कोण?
कुलमान घिशिंग हे अभियंता असून त्यांनी नेपाळ इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून दोन कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. 2016 ते 2020 आणि 2021 ते 2025 या दोन कार्यकाळात त्यांनी नेपाळातील लोडशेडिंग संपवून वीज पुरवठ्यात क्रांतिकारी बदल घडवून आणला. त्यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1970 रोजी नेपाळमधील रामेछाप जिल्ह्यात झाला. भारतातील जमशेदपूर शहरातून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.
नेपाळातील लोडशेडिंग संपविण्यासाठी त्यांची ख्याती आहे. मात्र, 24 मार्च 2025 रोजी केपी शर्मा ओली यांच्या सरकारने त्यांना पदावरून दूर केले. कारण, त्यांनी काही उद्योगपतींचे थकबाकीचे वीजबिल माफ करण्यास नकार दिला होता.
भारताशी खास नाते
कुलमान घिशिंग यांचे भारताशी शिक्षणाच्या माध्यमातून खास नाते आहे. याशिवाय त्यांनी 2023-24 मध्ये भारताला वीज निर्यात करण्याची ऐतिहासिक सुरुवात केली. जलविद्युत उत्पादनात आमूलाग्र बदल घडवून आणल्याने त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. आजच्या घडीला नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदासाठी कुलमान घिशिंग यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. देशभरातील युवकांनी त्यांना मोठा पाठिंबा दिला असून आता नेपाळच्या राजकारणात त्यांची एंट्री जवळपास निश्चित मानली जात आहे.
ओली सरकारविरुद्धच्या या संतापजनक आंदोलनादरम्यान अनेक शहरांत हिंसाचार झाला. संसद भवन, नेत्यांची निवासस्थाने आणि सरकारी कार्यालयांवर आंदोलकांनी तोडफोड केली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही युवकांचा मृत्यू झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. त्यामुळे ओलींवर सतत दबाव वाढत होता. याआधीच गृहमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी राजीनामा सादर केला होता. अखेर ओलींनाही सत्ता सोडावी लागली.
नेपाळमध्ये अंतरिम पंतप्रधानांच्या नावावर अद्याप एकमत होत असल्याचे दिसत नाही. नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदासाठी सुशीला कार्की यांचे नाव समोर आले असतानाच त्या भारत समर्थक असल्याचे कारण पुढे करत त्यांना विरोध करण्यात आला.
निदर्शकांच्या एका गटाने अंतरिम पंतप्रधानपदासाठी सुशीला कार्की यांचे नाव नाकारले आहे. सुशीला कार्की भारत समर्थक असल्याचा आरोप या गटाचा आहे आणि त्यांना हे मान्य नाही.
पंतप्रधानांच्या नावाबाबत लष्कराच्या मुख्यालयात निदर्शक गटांशी 2 दिवसांपासून चर्चा सुरू आहे. नेपाळमध्ये गेल्या चार दिवसांपासून मोठा हिंसाचार सुरू आहे, सरकारने अचानक सोशल मीडियाच्या काही साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशात एका मोठ्या आंदोलनाला सुरुवात झाली.
15 हजार कैदी फरार
नेपाळमध्ये उफाळलेल्या या हिंसाचाराचा फायदा घेऊन, भारत आणि नेपाळच्या सीमेवर असलेल्या विविध जेलमधून तब्बल 15000 कैदी फरार झाले आहेत. यापैकी 60 कैद्यांना भारत आणि नेपाळ सीमेवर तैनात असलेल्या सशस्त्र सीमा दलाकडून पकडण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या या सर्व कैद्यांना भारत आणि नेपाळच्या सीमेवर असलेल्या चौक्यांवर ठेवण्यात आले आहे. नेपाळच्या जेलमधून फरार झालेल्या कैद्यांपैकी 22 कैद्यांना उत्तर प्रदेशमधून तर दहा कैद्यांना बिहारमधून, तीन जणांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. नेपाळमध्ये सुरू असलेल्या गोंधळाचा फायदा घेऊन हे कैदी फरार झाले आहेत.