
>> ओकुहाराला नमवून काढला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पराभवाचा वचपा
कोरिया ओपन वर्ल्ड सुपर सीरिजच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूने रविवारी जपानच्या नोझोमी ओकुहाराचा २२-२०, ११-२१, २१-१८ असा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी सिंधू पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.
कोरिया ओपन सुपर सीरिजच्या अंतिम सामन्यात सिंधूसमोर जपानच्या ओकुहाराचे आव्हान होते. पहिल्या गेममध्ये ओकुहाराने सिंधूला कडवी झुंज दिली. प्रत्येक गुणासाठी उभयतांमध्ये संघर्ष दिसून आला. अखेरीस पहिला गेम सिंधूने २२-२० ने जिंकला. दुसर्या गेममध्ये सिंधूकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र सिंधूला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या गेममध्ये सिंधूचा खेळ एकदम फिका पडला. ओकुहाराने दुसरा गेम २१- ११ ने जिंकला. सिंधू आणि ओकुहाराने प्रत्येकी एक गेम जिंकल्याने निर्णायक तिसरा गेम हा उत्कंठा वाढवणारा ठरला. तिसर्या गेममध्ये सुरुवातीला सिंधूने आघाडी घेतली. सिंधू हा गेम सहज जिंकेल असे वाटत असतानाच ओकुहाराने सामन्यात पुनरागमन केले. या गेमच्या अखेरच्या टप्प्यात ओकुहाराचे ङ्गटके परतवून लावताना सिंधूची दमछाक झाली. या गेममध्ये प्रेक्षकांना दीर्घ ‘रॅली’ पहायला मिळाल्या. या गेममधील एक रॅली तर ५६ फटक्यांची होती. या गेमच्या प्रारंभी मिळविलेली आघाडी सिंधूच्या कामी आली. अखेरचे काही गुण मिळविण्यासाठी सिंधूचा संघर्ष करावा लागला. लाईनचा अंदाज न आल्याने तिने काही टाळता येण्यासारख्या चुका केल्या. या चुकांचा फायदा घेण्यात ओकुहारा कमी पडल्याने अटीतटीचा तिसरा गेम सिंधूने २१-१८ असा जिंकला.
१९९१ साली सुरू झालेल्या कोरिया ओपन स्पर्धेत आत्तापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला आपली चमक दाखवता आली नव्हती. सिंधूने ही स्पर्धा जिंकत नवीन इतिहास रचला आहे. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने गेल्या वर्षी चायना सुपर सीरिज जिंकली होती. या वर्षाच्या सुरुवातीलाच इंडिया सुपर सीरिज आणि सय्यद मोदी ग्रांप्री किताबही तिने पटकाविला होता. अशा प्रकारे २०१७ मधील हे तिचे तिसरे सुपर सीरिज जेतेपद आहे. दोन आठवड्यांपूर्वी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ओकुहाराने सिंधूचा पराभव केला होता. कोरिया ओपन सुपर सीरिजमध्ये ओकुहारावर मात करत सिंधूने या पराभवाची परतङ्गेड केली.
अन्य गटातील विजेते
मिश्र दुहेरी ः प्रवीण जॉर्डन व डेबी सुसांतो (इंडोनेशिया) वि. वि. वांग यिलयू व हुआंग डोंगपिंग (चीन), २१-१७, २१-१८, महिला दुहेरी ः हुआंग याकुआंग व यू झियाओहान (चीन) वि. वि. चांग ये ना व ली सो ही (द. कोरिया) २१-११, २१-१५, पुरुष एकेरी ः अँथनी सिनिसुका गिनटिंग (इंडोनेशिया) वि. वि. जोनाथन क्रिस्टी २१-१३, १९-२१, २२-२०, पुरुष दुहेरी ः मथायस बो व कर्स्टन मॉर्गेनसन (डेन्मार्क) वि. वि. मार्कुस फेर्नाल्डी गिडियोन व केव्हिन संजया सुकामुलजो २१-१९, १९-२१, २१-१५ (इंडोनेशिया)