सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण

0
128

जगातील सर्वांत दुसरे मोठे धरण ठरलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे तब्बल ५६ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पासाठी जेव्हा बँकांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा मंदिरांनी पैसे दिल्याने धरणाचे काम पूर्ण झाल्याचे मोदी म्हणाले.
तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. मात्र, विस्थापितांनी विरोध दर्शवत मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली ‘नर्मदा बचाव आंदोलन’ केल्याने प्रकल्प वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या आंदोलनाची दखल घेण्यात आल्याने जागतिक बँकेने सरदार सरोवर प्रकल्पाचा निधी परत घेतला होता. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असल्याने गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांना फायदा होणार आहे.
सरदार सरोवर प्रकल्पाची उंची १२१.९२ मीटरवरून १३८ मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या धरणात ४.७३ दशलक्ष घनमीटरपर्यंत पाणी साठवता येणार आहे. या धरणामुळे सुमारे १० लाख शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. या प्रकल्पातून होणार्‍या एकूण वीजनिर्मितीपैकी सुमारे ५६ टक्के वीज महाराष्ट्राला मिळणार आहे.
कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री विजय रूपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आदी उपस्थित होते. धरणाच्या निर्मितीसाठी ६५ हजार कोटींचा खर्च आला आहे.