मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कुमारस्वामी यांच्याशी गोव्यातील पायाभूत सुविधांचा विकास, पोलाद उद्योगातील संधी व औद्योगिक विकास आदींविषयी चर्चा
केली.
यावेळी मुख्यमंत्र्यानी राज्यात औद्योगिक गुंतवणूक वाढवण्यासाठी कुमारस्वामी यांच्याकडे मदतीची मागणी केली. ‘विकसित गावा 2037’साठी दीर्घकालीन औद्योगिक धोरण राबवणे, राज्यातील तरूणांसाठी रोजगार निर्मिती, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान व शाश्वत उद्योग याबाबतही या भेटीत चर्चा झाली.
या भेटीनंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, केंद्रातील भाजप सरकारकडून गोवा सरकारला सातत्याने सर्व ते सहकार्य मिळत आहे. त्यामुळे गोव्यात झपाट्याने विकासकामे होऊ लागली आहेत. केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे मार्गदर्शन गोव्याच्या औद्योगिक व पोलादाशी संबंधीत क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या क्षेत्रात विकसित भारत 2037च्या उद्दिष्टांशी सुसंगत पद्धतीने गोव्याचा औद्योगिक विकास साधला जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जीएसटी बैठकीला हजेरी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जीएसटी मंडळाच्या 56 व्या बैठकीत भाग घेतला.