>> उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचा दावा : विद्यार्थी-शिक्षकांवर ताण
गोव्यात फिफा १७ वर्षाखालील वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेसाठी सहामाही परिक्षा वेळापत्रकानुसार न घेता ७ ऑक्टोबर पूर्वी सर्व परिक्षा पूर्ण करण्याचे परिपत्रक काढून शिक्षण खाते व शालांत मंडळाने विद्यार्थी व शिक्षकांचाच फुटबॉल बनवला असून त्यामुळे विद्यार्थ्यांवर बराच ताण आला आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारचे निर्णय घेण्यापूर्वी सर्व संघटनांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा, अन्यथा यापुढे शिक्षक रस्त्यावर येतील असा इशारा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अनंत पिसुर्लेकर, दिलीप धारगळकर व माविन मिरांडा यांनी डिचोलीत पत्रकार परिषदेत दिला.
शाळांचे वेळापत्रक हे पूर्वीच ठरलेले असते. त्यानुसार वर्षाची आखणी व अभ्यासक्रमाची रूपरेषा ठरलेली असते. मात्र ९ ऑक्टोबरला सुरू होणार्या परिक्षा ७ ऑक्टोबरपूर्वीच पूर्ण करण्याचे परिपत्रक काढून शिक्षक खात्याने मोठा घोळ घातला आहे असा दावा खात्याच्या परीपत्रकानुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दिवसभर मुलांना वेठीस धरले जात असून शिक्षकांनाही सकाळी सायंकाळ काम करावे लागत आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी सर्व शैक्षणिक संघटना व पालकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र तसे न करता सरकारने एकतर्फी निर्णय घेतल्याने विद्यार्थी वर्गावर ताण आलेला आहे. शिक्षकही दबावाखाली असून सहामहिने परीक्षेचे गुण हे वार्षिक परिक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येत असल्याने त्याचा परिणाम होणार असल्याचे दिलीप धारगळकर यांनी सांगितले.
जागतिक करंडक फुटबॉल स्पर्धेचे तीनच सामने गोव्यात होणार आहेत. त्याचा किती विद्यार्थ्यांना लाभ मिळणार हा संशोधनाचा विषय असुन त्यासाठी विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव आणणे चुकीचे आहे असे ते म्हणाले.
शिक्षणाच्या क्षेत्रात अशाप्रकारे एकतर्फी निर्णय चुकीचा असून या लगीनघाईमुळे विद्यार्थी आपल्या भविष्याच्या वाटचालीत हरवला जाण्याचा धोका पालकानांही आहे. त्यामुळे यापुढे असे निर्णय घेताना सर्व घटकांना विश्वासात घेऊनच घेण्यात यावेत अशी मागणी उच्च माध्यमिक शिक्षण संघटनेने केली आहे.
जादा वर्ग न घेण्यासाठी परिपत्रक
अतिरिक्त वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची घाई नको, असे स्पष्टीकरण शिक्षण संचालक गजानन भट यांनी शुक्रवारी एका परिपत्रकाद्वारे केले. शिक्षण खात्याने ङ्गिङ्गा १७ वर्षाखालील विश्वकप ङ्गुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ७ ऑक्टोबरपूर्वी पहिली सत्र परीक्षा पूर्ण करण्याची सूचना विद्यालय व्यवस्थापनांना केली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यालयातून निर्धारित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वर्ग घेतले जात आहेत. या अतिरिक्त वर्गाबाबत पालक व शिक्षक वर्गाने नापसंती व्यक्त केलेली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याला खास परिपत्रक जारी करून स्पष्टीकरण करावे लागले आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्याची घाई नको. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जादा वर्गाचे आयोजन करून मुलांना वेठीस धरू नये. परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमाचा प्रश्न पत्रिकेत समावेश करण्याची सूचना करण्यात आली आहे. या बाबत अधिक स्पष्टीकरणासाठी शाळा व्यवस्थापनानी संबंधित विभागीय अधिकार्याशी संपर्क साधावा, असेही परिपत्रकात म्हटले आहे.