Home बातम्या सर्व 12 तालुक्यांत ‘खेलो इंडिया’ केंद्रे

सर्व 12 तालुक्यांत ‘खेलो इंडिया’ केंद्रे

0

क्रीडामंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्यातील बाराही तालुक्यांत ‘खेलो इंडिया’ केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गोवा विधानसभेत दिली.
प्रश्नोत्तराच्या तासाला गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.
2021 पासून गोव्यातून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडासंघांची संख्या 40 वरुन 19 वर का आली आहे, असा प्रश्न सरदेसाई यांनी विचारला होता.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत देशातील पहिले येणारे 8 क्रीडा संघ आणि एकेरी खेळात पहिले 8 क्रीडापटू सहभागी होऊ शकतात. 2023 साली नोव्हेंबर महिन्यात या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात झाल्या होत्या. त्यामुळे गोवा हे या स्पर्धांचे आयोजन राज्य असल्याने गोव्याला त्यावेळी सर्व क्रीडा प्रकारात सहभागी होण्याची मुभा मिळाली होती. मात्र, तद्नंतर या स्पर्धा दुसऱ्या राज्यात झाल्याने गोव्याला ती मुभा मिळू शकली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
त्यावेळी बोलताना सरदेसाई यांनी गोवा सरकारला राज्यातील वेगवेगळ्या खेळासंबंधीच्या क्रीडा संघटनांना अनुदान देण्यास अपयश आल्याने क्रीडापटूंना आवश्यक ते प्रशिक्षण व अन्य सुविधा न मिळू शकल्याने ते स्पर्धेमध्ये मागे पडल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.
फुटबॉल हा राज्य क्रीडा प्रकार असताना सरकारने राज्य फुटबॉल संघटनेला पैसे देण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. गोवा सरकार राज्य फुटबॉल संघटनेला 11 कोटी रुपये एवढे अनुदान देणे असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्याशिवाय अन्य कित्येक क्रीडा संघटनांना अनुदान देण्यास सरकारला अपयश आल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वी दिलेल्या पैशांचा कसा वापर केला त्यासंबंधीचे प्रमाणपत्र देऊ न शकलेल्या क्रीडा संघटनांचे अनुदान रोखून ठेवण्यात आले आहे. त्यांनी ते प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यांना अनुदान दिले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी युरी आलेमाव यांनी राज्यातील बाराही तालुक्यात खेलो इंडियाचे केंद्र सुरू केले जावे, अशी मागणी केली. त्यावर ती मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.