उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत या दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी भवन बांधण्यात येणर असल्याची माहिती काल पंचायतमंत्री माविन गुदिन्हो विधानसभेत दिली.
काल विधानसभेत शून्यतासाला नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींसंबंधी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना गुदिन्हो यांनी वरील माहिती दिली. दक्षिण गोवा जिल्हा पंचायत कार्यालयात कर्मचाऱ्यांची उणीव असून. तेथे रिक्त असलेली पदे त्वरित भरण्याची सोय केली जावी, अशी मागणी तुयेकर यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना गुदिन्हो यांनी सदर कार्यालयात यूडीसीसह अन्य महत्त्वाची पदे रिक्त असल्याचे मान्य केले. जिल्हा पंचायतींसाठी थेट पदभरती होत नाही. पदे रिक्त झाली की दुसऱ्या खात्यांतील कर्मचाऱ्यांना तेथे पाठवले जाते. जिल्हा पंचायतींसाठी जोपर्यंत थेट पदभरती सुरू होणार नाही, तोपर्यंत रिक्तपदे विनाविलंब भरता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी हस्तक्षेप करताना आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी झेडपी भवन बांधण्याची मागणी केली. ती उचलून धरताना उत्तर गोवा जिल्हा पंचायत आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी भवन उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन गुदिन्हो यांनी दिले.