नरेंद्र मोदी – ऍबे यांच्या हस्ते बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी

0
234

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी काल एका विशेष सोहळ्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाची पायाभरणी केली. यावेळी भारत-जपान यांची ही भागिदारी विशेष, धोरणात्मक व वैश्‍विक असल्याचे प्रतिपादन ऍबे यांनी केले. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लागणार्‍या ४००० कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी वडोदरा येथे उभारण्यात येणार्‍या संस्थेची पायाभरणीही उभय पंतप्रधानांनी केली.

अहमदाबादमधील साबरमती येथे एका मैदानावर उभय पंतप्रधानांनी ही पायाभरणी केली. ऍबे पुढे म्हणाले, ‘माझे चांगले मित्र नरेंद्र मोदी हे दूरदर्शी व्यक्तीमत्व आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी भारतात अत्युच्च वेगाची ट्रेन आणून नव्या भारताची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. आता जेव्हा पुढील काही वर्षांनंतर भारतात येईन तेव्हा बुलेट ट्रेनच्या खिडक्यांमधून मी सुंदर भारताचे दर्शन घेण्याची आशा बाळगतो’
मुंबई-अहमदाबाद दरम्यान १.१० लाख कोटी रुपये खर्चाच्या मार्गावरून २०२२ साली बुलेट ट्रेन धावण्याची अपेक्षा आहे. मुंबई-अहमदाबाद हे ५०० कि. मी.चे अंतर ही बुलेट ट्रेन दोन तासात पार करणार आहे.
या सोहळ्यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपानकडून भारताला कर्ज मिळणार आहे. भारतीय रेल्वे व जपानच्या शिंकान्सेन टेकनॉलॉजी यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे.