राज्यातील अभयारण्यात गोवा सरकार जे ‘इको टुरिझम’ प्रकल्प आणू पाहत आहे. त्यामुळे या अभयारण्यातील जीवसृष्टी आणि निसर्गाला धोका निर्माण झालेला असून, हे प्रकल्प रद्द केले जावेत, अशी मागणी राज्यातील पर्यावरणप्रेमींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यातील अभयारण्यात राज्य सरकारने कित्येक प्रकल्प मंजूर केलेले असून, त्यांना मान्यता देण्यासाठी राज्य वनजीव मंडळावर दडपण आणले जात आहे, असा आरोप पर्यावरणप्रेमी क्लाऊड आल्वारिस यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.
व्याघ्र आरक्षणासाठीचे जे प्रमुख क्षेत्र आहे, त्या सुर्ला गावात विशेष पर्यटन प्रकल्प उभारण्यासाठी कंत्राट देण्यात आले असल्याचे आल्वारिस यांनी पत्रातून पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले आहे. या प्रकल्पाला वन्यजीवांपासून संरक्षण देण्यासाठी विद्युत तारांचा वापर करून कुंपण घालण्याची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आल्वारिस यांनी पत्रात नमूद केले आहे.
अशाच प्रकारचा अन्य एक प्रकल्प मोले येथील अभयारण्यात आणण्याचाही सरकारचा विचार आहे. त्याशिवाय मोले येथील अभायारण्यातील काले येथे एका खाण कंपनीने जे लोडिंग व अनलोडिंगसाठीच्या सुविधेसंबंधीचा प्रस्ताव सरकारला दिलेला आहे, असेही पत्रात नमूद केले आहे.