सुकेकुळण-धारगळ येथील घटना; संशयिताला करासवाडा-म्हापसा येथून अटक
जखमी विद्यार्थ्यावर गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू; प्रकृती अजूनही चिंताजनक
सुकेकुळण-धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गानजीक काल सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान एका 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर ॲसिड हल्ला झाला. या ॲसिड हल्ल्यात सदर विद्यार्थी हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने हा हल्ला केला. या प्रकरणी म्हापसा, पेडणे आणि मांद्रे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या 12 तासांच्या आत संशयिताला करासवाडा-म्हापसा येथील औद्योगिक वसाहतीतून ताब्यात घेत गजाआड केले. नीलेश गजानन देसाई (रा. कळणे-दोडामार्ग) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. चौकशीदरम्यान संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
सविस्तर माहितीनुसार, सदर 17 वर्षीय विद्यार्थी म्हापशातील एका महाविद्यालयात शिकत असून, काल सकाळी त्याला त्याच्या वडिलांनी सुकेकुळण-धारगळ येथील बसथांब्यावर महाविद्यालयात जाण्यासाठी सोडले आणि ते घरी परतले. काही वेळानंतर काळ्या रंगाचा रेनकोट, हँडग्लोव्हज् आणि ॲक्टिवा दुचाकीवरून सफेद रंगाच्या बादलीत द्रव पदार्थ घेऊन एक तरुण त्या ठिकाणी आला आणि त्याने काही कळायच्या आतच सदर विद्यार्थ्यावर तो द्रव पदार्थ फेकून मारला. सदर द्रव पदार्थ त्याच्या चेहरा आणि अंगावर पडल्याने त्याचे शरीर भाजले. त्यानंतर हा द्रव पदार्थ आणखी काही नसून ते ॲसिड असल्याचे स्पष्ट झाले. या हल्ल्यात तो 30 टक्के भाजला गेला. या हल्ल्यानंतर जोराने किंचाळत तो खाली कोसळला आणि मदतीसाठी याचना करू लागला. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरून अनेक वाहने ये-जा करत होती; परंतु कोणीही त्याच्या मदतीला धावले
नाही.
ज्या परिसरात सदर विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत उभा होता, तेथून 100 मीटर परिसरात त्याचे नवीन घर आहे. त्याचे वडील हे पोलीस सेवेत असून, ते पणजीत कार्यरत आहेत. त्यांच्या ओळखीतील एकाने त्यांना फोन केला आणि सदर घटनेविषयी माहिती दिली. यानंतर लगेच ते दुचाकीवरून घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांच्या मुलाने आपल्यावर ॲसिड फेकल्याचे त्यांना सांगितले. यानंतर त्यांनी पुन्हा घराकडे जात घटनास्थळावर चारचाकी आणून त्यात मुलाला बसवून आझिलो इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला गोमेकॉ इस्पितळात पाठवण्यात आले.
विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक
ॲसिड हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. या हल्ल्यात ऋषभच्या डोळे, गाल, नाक व खांदा भाजला असून, खोलवर जखमा झालेल्या आहेत. गेोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी ही माहिती दिली.
संशयिताकडून गुन्ह्याची कबुली
संशयित नीलेश देसाई याने गुन्हाची कबुली दिली आहे. आपल्या मुलीच्या अलीकडेच झालेल्या मृत्यूला सदर मुलगा जबाबदार असल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केले. त्या प्रकरणाचा तपास सिंधुदुर्ग पोलीस करीत आहेत. त्या मुलाचे नीलेश देसाईच्या मुलीशी प्रेमसंबंध होते, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
सूड उगवला! ॲसिड हल्ल्याची दुसरी बाजू
विद्यार्थ्यावरील ॲसिड हल्ला प्रकरणानंतर आता नवनवी माहिती समोर येत असून, या प्रकारामागील कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. या हल्ल्या प्रकरणी ज्या नीलेश देसाई याला संशयिताला अटक केली आहे, त्याने बदल्याच्या भावनेतून हे कृत्य केल्याचे मागील काही घटनांतून समोर येत आहे. नीलेश देसाई याच्या मुलीचा मे महिन्यात काविळीने मृत्यू झाला होता; मात्र तिच्या मृत्यूला सदर 17 वर्षीय विद्यार्थी कारणीभूत असल्याचा संशय नीलेश देसाई याला होता. सदर विद्यार्थ्याच्या छळाला कंटाळून आपल्या मुलीने विषप्राशन केले आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचा संशय नीलेश देसाई याला होता. त्यामुळे सूड उगवण्यासाठीच त्याने हा हल्ला केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे.
ॲसिड हल्ल्याच्या कृत्यामागे वेगवेगळी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर मुलगा आणि मुलगी दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. सदर मुलगी पेडणे तालुक्यातील एका गावात आपल्या मामाकडे राहून शिक्षण घेत होती. एकाच महाविद्यालयात ते दोघे शिकत होते. नीलेश देसाई याच्या मुलीचे निधन काविळीने झाले असले तरी वडिलांना मात्र विषप्राशन केल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचा संशय होता. तसेच गावातही तशीच चर्चा होती. त्याच्या मुलीचे बारावीपर्यंतचे शिक्षण गोव्यात झाले होते; मात्र शिक्षण घेत असताना सदर मुलगा तिला त्रास देत होता. या छळाला कंटाळून तिने विषप्राशन केल्याचा संशय वडिलांना होता. त्यातूनच त्याने हे कृत्य केले. अशी एक दुसरी बाजू देखील समोर आली आहे.
‘त्या’ मुलीचा मृत्यू कशामुळे?
सदर मुलीच्या मृत्यूनंतर शवचिकित्सा करण्यात आली होती; त्यात तिच्या मृत्यूचे कारण नमूद करण्यात आले आहे. मात्र पोलिसांकडून अद्याप त्याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या मुलीचा मृत्यू काविळीने झाला की विषप्राशनाने हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
आठ दिवसांपूर्वीच संशयित गोव्यात येत होता कामाला
नीलेश देसाई हा कळणे खाणीच्या ठिकाणी जेवण पुरवठा करत होता. ते काम बंद झाले म्हणून त्याने आठ-दहा दिवसांपूर्वी करासवाडा येथे एका कंपनीत काम शोधले होते. तेथे तो कामाला जात होता. सदर विद्यार्थ्याची त्याच मार्गावरून ये-जा असल्याने पाळत ठेवून त्याने हा हल्ला केला.