Home बातम्या उन्मत्त सत्ताधार्‍यांचा निर्लज्ज कबुलीजबाब

उन्मत्त सत्ताधार्‍यांचा निर्लज्ज कबुलीजबाब

0

– एन्. शिवदास

उन्मत्त झालेल्या कॉंग्रेस पक्षाची धुरा डोक्यावर घेऊन गोव्यात गेली सात वर्षे यथेच्छ थैमान घालणार्‍या प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर व मुख्यमंत्रिपदाला पाच वर्षे स्थैर्य देण्यासाठी किती किंमत मोजावी लागली हे गुलदस्त्यात ठेऊन पत्रकारांसमोर ‘कन्फेस’ होणार्‍या दिगंबर कामत यांची परवाची पत्रकार परिषद म्हणजे ‘पाद्रीच्या खिडकीत तोंड लपवून दिलेली कबुली’ अथवा ‘कुमसार’ किंवा ‘कन्फेशन’ असेच म्हणावे लागेल.

जेव्हा सत्ता हाती असते, अध्यक्षपद मस्तकी थाटलेले असते तेव्हा सत्तेची नशा कोणाला भानावर ठेवत नाही. सत्तेची नशा तर व्हिस्कीच्या नशेपेक्षाही भयंकर असते. कॉंग्रेस पक्षाला विधानसभेत एक आकडा म्हणजे एक पाय घेऊन लंगडत लंगडत (कुबडीसुद्धा नाही!) विधानसभेत जाण्याचा दुर्दैवी प्रसंग येतो तेव्हा डोके शाबूत असणार्‍या कॉंग्रेसच्या सच्च्या सामान्य कार्यकर्त्यांनी आता शांत डोक्याने विचार करण्याची हीच वेळ आहे.

‘ऍबसोल्युट पॉवर करप्टस्’ या प्रसिद्ध वाक्याची प्रचीती गोव्यात कॉंग्रेसच्या पराभवाने पुन्हा एकदा आलेली आहे. परवा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पत्रकारांसमोर एकटे सामोरे न जाता एकमेकांची ढाल करीत संयुक्तरित्या पत्रकार परिषदेला संबोधित करण्याचे ठरविले. परंतु, या पत्रकार परिषदेत जे कबुलीजबाब दोघेही देऊ लागले त्याची कदर करावीच लागेल. सर्वसामान्य कार्यकर्त्याला, मग तो कितीही हुशार असो, विचारवंत असो, कार्यतत्पर असो, पक्षनिष्ठ असो, शिक्षणतज्ज्ञ असो सत्ताधीशासमोर त्याला कवडीचीही किंमत नसते, हे या दोघांनीही दाखवून दिले, याचे स्मरण या दोघांनाही मला करून द्यावेसे वाटते.

इतर विषयांचे सोडून द्या, माध्यम प्रश्‍नाविषयी तर मी या दोघांनाही पुन्हा पुन्हा भेटून, सुभाषला पत्र लिहून कोंकणी-मराठी विरूद्ध निर्णय घेऊ नका असे सुचविले होते. सुभाष शिरोडकरांना तर, कॉंग्रेस भवनात दोन मिनिटे या प्रश्‍नावर बोलण्याची विनंती केली होती. परंतु नंतर बोलूया म्हणत, जास्तीत जास्त पालक इंग्रजी मागताहेत एवढेे म्हणत मला त्यांनी झिडकारले होते. दिल्लीत हायकमांडने बोलावलेल्या बैठकीपूर्वीही मुख्यमंत्री बैठकीतून मध्येच उठून बाहेर आले असता, त्यांचा पिच्छा पुरवून मी म्हटले, ‘दिगंबरबाब, विधानसभेत दिलेल्या ’स्टेटस को’चा म्हणजे ‘जैसे थे’ चा पुनरूच्चार करा, इंग्रजीच्या बाजूने निर्णय आमच्या अंगलट येणार’, दिगंबरबाब माझ्याकडे बघून उपहासाने मंद हसले व आत गेले. सुभाषची कॉलर पकडून चर्चिल अख्खा गोवा निवास फिरत होता. सभेत आम्हाला आमची मते स्पष्टपणे मांडण्याची संधी दिली, परंतु, चर्चिल- मॉवीनच्या, लुइझिन फालेरो – मॅबेल (मंगळूरची खासदार), व आलेक्स सिक्वेरा यांच्या म्हणण्यासमोर आमचे म्हणणे नुसती हवेतील वाफ ठरवली या लोकांनी! दिगंबर कामत तर, ‘मराठीतून शिकलेले नुस्ते ऑफिस शिपाई बनू शकतात’ इथपर्यंत विधान करण्याचे धारिष्ट्य करू शकले. तेव्हा या दिगंबरांच्या कौटुंबिक पार्श्‍वभूमीचा व त्यांच्या पदवी शिक्षणाचा माझ्यासारख्यांना संशय यायला लागला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठीतून झालेले. तरीही ते माध्यमप्रश्‍नावर बरळून गेले. जे घडले, जसे हे सारेजण वागले आणि ज्या फाजिल आत्मविश्‍वासाने निवडणुकीला सामोरे गेले त्यातून शेवटी काय मिळविले?

अति गर्व व फाजिल आत्मविश्‍वासाने वावरणार्‍या सुभाष शिरोडकरांना तर, शिरोड्याच्या भाषाप्रेमी, संस्कृतीप्रेमी मतदारांनी दुसर्‍यांदा घरी बसवून जन्मात विसरणार नाहीत अशी अद्दल घडविली आहे. दिगंबर कामत यांनी आपले स्थान टिकविले. ते आता आमदार म्हणून हिरमुसल्याप्रमाणे वागण्यापुरतेच! एका गुन्हेगाराच्या मनाने जनमानसात फिरण्याची पाळी त्यांच्यावर आलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या तोर्‍यात काल-परवापर्यंत मिरवणारे दिगंबर आता अगदी ‘दिगंबर’ झाले आहेत. मुख्यमंत्रीपदावर पाच वर्षे राहिले परंतु, एक तरी रात्र चिंतामुक्त शांत झोप घेतली असेल की नाही ते त्यांचे ते आणि देवच जाणे! नेहमी देव देव करीत मंदिरे आणि तीर्थाटने, घाडी-भगत, दर्गे, समिधा, मोळी माथ्यावर घेऊन यज्ञकुंडांची प्रदक्षिणा काढणारा मुख्यमंत्री, मनगटाला गंडे-दोरे गुंडाळून ‘आपल्या खुर्चीला सांभाळ रे देवा’ म्हणत भोंदूबाबांच्याही पायावर नाक घासणारे, भारतीय संविधानाचाही उपमर्द करणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपला इतिहास कसा लिहू नये याचे जागते उदाहरण आमच्यासारख्या लेखकांच्या लेखनासाठी वाट्याला आलेले आहे.

आज दोघेही नेते पत्रकारांसमोर ‘कुमसार’ होत आहेत. चांगली गोष्ट आहे. ‘इट इज बेटर लेट दॅन नेव्हर’ अशी इंग्रजी म्हण आहे. सत्तेचा मोह, उन्मत्तपणा, धुंदी, नशा आणि मुख्यमंत्री या पदाची शान राखता सर्व मंत्र्यांना प्रती मुख्यमंत्र्यांची मुभा देऊन खुले आम कमिशनचा, नोकर्‍या विकण्याचा परवाना देणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव गोव्यातील आजवरच्या मुख्यमंत्र्यांच्या इतिहासात नोंद करावेच लागेल. लुटालुटीला, कमिशनांना, ड्रग्ज व्यापाराला, जमिनींच्या रूपांतरणाला, पर्यावरणाच्या विनाशाला, बेकायदा खाणींच्या मोठा गैरव्यवहाराला, भाषा आणि संस्कृतीच्या नरडीचा घोट घेण्यास जबाबदार असलेले कॉंग्रेसचे सरकार हा या सरकारला लागलेला डाग कधीही पुसला जाणार नाही.

कॉंग्रेस पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा इरादा दोघांनीही पत्रकार परिषदेत व्यक्त केला. चांगली गोष्ट आहे. परंतु, निष्ठावंतांना ठोकरून खुषमस्कर्‍या झोकरांची पक्षात खोगीरभरती केल्यास पुन्हा तीच पाळी पक्षावर आल्याशिवाय राहणार नाही. याचे थोडेतरी भान या नेत्यांनी ठेवल्यास बरे होईल!