Home Featured गावडेंना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय माझा

गावडेंना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय माझा

0

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले स्पष्ट; नव्या मंत्र्याच्या नियुक्ती किंवा शपथविधीबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही

गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय हा सर्वस्वी माझा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पर्वरी येथे मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली. नवीन मंत्र्याची नियुक्ती वा शपथविधीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटविल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न बुधवारपासून पत्रकारांकडून सुरू होता; मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्यानंतर काल दुपारी पर्वरी येथे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी गोविंद गावडेंना मंत्रिमंडळातून हटवल्याच्या विषयावर पहिल्यांदाच भाष्य केले. आपणच गावडे यांना मंत्रिमंडळातून हटविण्याचा निर्णय घेतला. नवीन मंत्र्यांच्या नियुक्तीबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिस्त पाळावी लागणार : दामू नाईक
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्याला पक्षाच्या नियमावलीचे अनुकरण करून शिस्तीचे पालन करावे लागणार आहे. त्या व्यक्तीने आपली जुनी विचारसरणी विसरून भाजपच्या विचारसरणीचे अनुकरण केले पाहिजे. भाजपच्या शिस्तीचे पालन न केल्यास त्यांच्यावर राज्य आणि केंद्र समितीकडून लक्ष ठेवले जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल सांगितले.

आमदार फुटीचे वृत्त तथ्यहीन : नाईक
राज्यातील सर्व मंत्र्याच्या कार्याचा आढावा घेऊन केंद्रीय नेतृत्वाला अहवाल सादर केलेला आहे. त्यामुळे केंद्रीय पातळीवरून गरज भासल्यास योग्य ते निर्णय घेतले जाणार आहेत. भाजपच्या आमदारांमध्ये फुटीबाबतचे वृत्त तथ्य हीन आहे, असेही दामू नाईक यांनी स्पष्ट केले.

भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवल्याने
गावडेंना हटवले : विजय सरदेसाई

गोविंद गावडे यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविल्याने त्याला मंत्रिपदावरून हटविण्यात आले, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी काल केला. भाजप हा पक्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करतो, तर भ्रष्टाचार करणाऱ्याला पाठीशी घालतो, अशी टीका त्यांनी केली. गोविंद गावडे यांना का हटवले, याविषयी मुख्यमंत्री किंवा भाजपने स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी देखील सरदेसाई यांनी केली.

युरी आलेमाव यांची भाजपवर टीका
भाजपकडून भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाते. गोविंद गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्यातील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविल्याने त्यांना मंत्रिपदावरून हटविण्यात आले, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. भाजप सरकारच्या विद्यमान मंत्रिमंडळातील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मात्र गावडे यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली, असेही आलेमाव म्हणाले.

‘उटा’चे मौन
गोविंद गावडे यांना राज्य मंत्रिमंडळातून डच्चू देऊन 24 तास उलटले तरी उटा या संघटनेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मध्यंतरी गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर उटाने फर्मागुडी येथे एक सभा घेऊन गावडे यांना मंत्रिपदावरून हटविल्यास गंभीर परिणामांचा इशारा दिला होता.

आणखी दोघा मंत्र्यांना वगळणार?
राज्य मंत्रिमंडळातून आणखी दोन मंत्र्यांना वगळण्यात येणार अशी चर्चा सुरू आहे. मंत्री आलेक्स सिक्वेरा हे आजारी असल्याने त्यांना मंत्रिपदावरून हटविले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आणखी एका निष्क्रिय आमदाराला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. रमेश तवडकर हे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. एसटी समाजातील आणखी एक आमदार गणेश गावकर हे सुध्दा मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत.

मंत्रिपदासाठी अनेक आमदार इच्छुक
मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच, काहींनी आपले मंत्रिपद कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपच्या केंद्रीय नेत्याकडून मंत्रिपदाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले दिगंबर कामत, मायकल लोबो, संकल्प आमोणकर हे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यांना भाजप प्रवेश करताना मंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. मधल्या काळात विविध कार्यक्रमांत मुख्यमंत्र्यांनी त्या तिघांनाही ‘अच्छे दिन’ येतील असे आश्वासन दिले होते. याशिवाय आमदार डिलायला लोबो ह्या सुध्दा मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.