फोनवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी 35 मिनिटे फोनवरून चर्चा केली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात कारवाया करताना भारताने कधीही कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारली नाही आणि भविष्यातही कधीही स्वीकारणार नाही, असे स्पष्ट विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदींनी फोनवर झालेल्या संभाषणात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर भारताची भूमिका स्पष्ट केली, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली.
गेल्या महिन्यातच पाकिस्तानने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला केला आणि भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवला. त्यानंतर पाकिस्तानने गुडघे टेकले आणि दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याच शस्त्रसंधीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर पंतप्रधानांचे हे विधान अतिशय महत्वाचे मानले जात आहे.
पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्धविराम
विक्रम मिस्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणात भारत-अमेरिका व्यापार करार किंवा अमेरिकेकडून भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी यासारख्या मुद्द्यांवर कोणत्याही स्तरावर चर्चा झालेली नाही. पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितले की, भारताने कधी मध्यस्थी स्वीकारली नाही आणि यापुढेही स्वीकारणार नाही. भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी कारवाई थांबवण्याबाबत दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये चर्चा झाली आणि ती पाकिस्तानच्या विनंतीवरून करण्यात आली, असेही मिस्री यांनी सांगितले.
भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यास युद्ध
इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडामधील जी-7 शिखर परिषद अर्ध्यावरच सोडली, तरीही पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली, ही चर्चा ट्रम्प यांच्या आग्रहावरून झाली. त्यात प्रामुख्याने भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या दहशतवादविरोधी मोहिमेवर चर्चा झाली. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानने यापुढे भारताविरुद्ध दहशतवादी हल्ला केला तर तो केवळ दहशतवादी हल्ला नाही तर प्रत्यक्ष युद्ध समजले जाईल असेही भारताने स्पष्ट केले.
ट्रम्प यांचा दावा काय होता?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी असा दावा केला होता की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केली आणि कथित अण्वस्त्र युद्ध होण्यापासून रोखले. आपणच दोन्ही देशांमध्ये व्यापारावर चर्चा करण्याचा प्रस्ताव देऊन शस्त्रसंधी घडवून आणली, असे ट्रम्प म्हणाले होते.