Home बातम्या एसटी समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य

एसटी समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य

0

एनईईटी, जेईई प्रवेश परीक्षा प्रशिक्षणासाठी मदत

राज्य सरकारच्या आदिवासी कल्याण खात्याने अनुसूचित जमातीच्या (एसटी) विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पात्रतेसह प्रवेश परीक्षा (एनईईटी) आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) च्या तयारीच्या प्रशिक्षणासाठी भगवान बिरसा मुंडा लक्ष्य सिद्धी योजना अधिसूचित केली आहे. या योजनेखाली एसटी समाजातील विद्यार्थ्यांना एनईईटी आणि जेईई या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षेच्या दोन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी तीन लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य केले जाणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वर्ष 2025-26 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये एसटी समाजातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रवेश परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी भगवान बिरसा मुंडा लक्ष्य सिद्धी योजनेची घोषणा केली होती. आदिवासी कल्याण खात्याने या योजनेची अधिसूचना जारी केली आहे. या योजनेखाली राज्यातील एसटी समाजातील 300 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी आर्थिक साहाय्य केले जाणार आहे. त्यातील 50 टक्के विद्यार्थ्यांना एनईईटी आणि 50 टक्के विद्यार्थ्यांना जेईई परीक्षेसाठी आर्थिक साहाय्य केले जाणार आहे.
आदिवासी खात्याकडून एसटी समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत 65 टक्के गुण मिळाले पाहिजेत. एसटी समाजातील विद्यार्थ्यांना अकरावी आणि बारावीच्या वर्गात असताना प्रशिक्षण दिले जाणार असून प्रति विद्यार्थी तीन लाख रुपयांचे साहाय्य केले जाणार आहे. वार्षिक आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्याला 100 टक्के प्रशिक्षण शुल्क दिले जाणार आहे. तर, आठ लाख रुपयांवर उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्याला 75 टक्के प्रशिक्षण शुल्क दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य दोन हप्त्यामध्ये वितरित केले जाणार आहे. अकरावी उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर केल्यानंतर दुसऱ्या वर्षासाठी आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑफलाईन प्रशिक्षणासाठी आर्थिक साहाय्य केले जाणार आहे. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी आर्थिक साहाय्य केले जाणार नाही.