Home Featured 100 टक्के साक्षरतेनंतर क्षयरोगमुक्त गोव्याचे लक्ष्य

100 टक्के साक्षरतेनंतर क्षयरोगमुक्त गोव्याचे लक्ष्य

0

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घटकराज्य दिन सोहळ्यात माहिती; राजभाषा पुरस्कारांचेही वितरण अन्‌‍ मान्यवरांचा सत्कार

गोव्याने 100 टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट पूर्ण केले असून, आता गोवा क्षयरोगमुक्त (टीबी) करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमीमध्ये आयोजित 39 व्या घटकराज्य दिन सोहळ्यात बोलताना काल दिली. क्षयरोगमुक्त गोवा ह्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या सोहळ्याला राज्य मंत्रिमंडळातील मंत्री माविन गुदिन्हो, सुभाष फळदेसाई, सुदिन ढवळीकर, बाबूश मोन्सेरात, रोहन खंवटे, सुभाष शिरोडकर, नीळकंठ हळर्णकर, गोविंद गावडे, उपसभापती ज्योशुआ डिसोझा, केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त सचिव अर्चना अवस्थी, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू व इतरांची उपस्थिती होती.

गोव्याच्या विकासाला चालना देताना वारसा आणि संस्कृतीच्या संवर्धनाकडे लक्ष दिले जात आहे. भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळे गोव्याचा झपाट्याने विकास होत आहे. मागील 10 वर्षाच्या कार्यकाळात गोव्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे. पायाभूत साधनसुविधांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या सहकार्यामुळे आम्ही पेडण्यापासून काणकोणपर्यंत पायाभूत सुविधा तयार करू शकलो. गोवा सर्व बाबतीत देशातील आघाडीचे राज्य ठरले आहे. गोव्याने केंद्र सरकारच्या 13 फ्लॅगशिप उपक्रमांपैकी 80 टक्के उपक्रम पूर्णत्वास नेले आहेत. गोव्याची ओळख ‘सन, सँड अँड सी’ अशी आहे. आम्ही त्यामध्ये आता आध्यात्मिक पर्यटनाचा समावेश केला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्र सरकार आत्मनिर्भर भारताच्या तत्त्वांनी मार्गदर्शन करीत आहे आणि गोवा स्वयंपूर्ण बनविण्याचे काम करीत आहे. जर आपण अधिक प्रयत्न केले तर आपण गोवा विकसित करू शकतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या कार्यक्रमात राजभाषा पुरस्कार, आयकॉनिक ब्रँड्‌‍स ऑफ गोवा पुरस्कारांचे वितरण झाले. स्वातंत्र्यसैनिकांच्या 16 मुलांना, तसेच अनुकंपा तत्त्वावर 31 जणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

गोमंतकीय ब्रँड्सचा सन्मान
राज्य सरकारतर्फे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख मिळवलेल्या गोमंतकीय ब्रँड्सना सन्मानित करण्यात आले. यावर्षी बिग फूट, पॉल जॉन, कॅफे तातो, गोमंत विद्या निकेतन, डांगी ऑप्टिशियन, मावझो स्टुडिओ, क्लब टिटो, ग्रासियस हॉस्पिटल आणि कावी कलाकार सागर नाईक मुळे यांना सन्मानित करण्यात आले. गोव्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या ब्रँडस्‌‍ना पुढील वर्षीपासून दरवर्षी सन्मानित करण्यात येईल.

तीन पुस्तकांचे प्रकाशन
राज्यातील पुढील पिढ्यांना गोव्याचा वारसा इतिहास समजावा यासाठी तीन पुस्तकांचे तसेच निमेशन वेबसिरीजचे अनावरण करण्यात आले. या सिरीजचा पहिला भाग 19 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सरकारी अधिकाऱ्यांचा गौरव
एससीईआरटीच्या संचालक मेघना शेटगावकर यांचा राज्यातील शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. दिलीश आनंद गावस देसाई (मुख्य वन सर्वेक्षक अभियंता) यांचा ताळगाव ग्रामपंचायतीचे स्वयंपूर्ण मित्र म्हणून सत्कार करण्यात आला. थानू नारायण जल्मी (सांख्यिकी अधिकारी, समाज कल्याण संचालनालय) यांचा बांदोडा ग्रामपंचायतीचे स्वयंपूर्ण मित्र म्हणून सत्कार करण्यात आला. ताळगाव ग्रामपंचायत आणि बांदोडा ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात आला.

5 सरकारी खात्यांचाही सन्मान
प्रशासनातील सर्वोत्तम पद्धतींचे पालन केल्याबद्दल पाच सरकारी खात्यांना सन्मानित करण्यात आले. स्वयंपूर्ण गोवा उपक्रमावरील कामासाठी नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन खाते, कचरा व्यवस्थापन उपक्रमांसाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ, दिव्यांग व्यक्तींशी संबंधित त्यांच्या एकूण कामासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी सक्षमीकरण खाते, स्वयं-मदत गटांच्या कल्याणासाठी सक्रिय सहभाग आणि कार्यासाठी ग्रामीण विकास खाते आणि जॉगर्स पार्कजवळील चिखली येथील कचरा उपक्रमासाठी पंचायत खाते यांना सन्मानित करण्यात आले.

राजभाषा पुरस्कारांचे वितरण
यावेळी कोकणी आणि मराठी साहित्यिकांना राजभाषा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोकणी आणि मराठी भाषांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा पुरस्कार दिला जातो. बा. द. सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार शंभूभाऊ बांदेकर, अनिल गजानन सामंत आणि रमेश वंसकर यांना देण्यात आला. तसेच ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त रवींद्र केळेकर कोकणी भाषा पुरस्कार माणिकराव राम नायक गावणेकर, सुरेश रामचंद्र पै आणि भिकू बोमी नाईक यांना देण्यात आला.

गायक अजित कडकडे यांना गोमंत विभूषण जाहीर
गोवा सरकारचा प्रतिष्ठेचा गोमंत विभूषण हा पुरस्कार गायक कलाकार आणि गोमंतकीय सुपुत्र पं. अजित कडकडे यांना प्रदान केला जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. पं. कडकडे हे सध्या मुंबईत स्थायिक असले तरी ते आजही आपण गोमंतकीय असल्याचे अभिमानाने सांगतात. त्यांना हा पुरस्कार जाहीर करताना आनंद वाटतो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

100 टक्के साक्षरतेचे लक्ष्य पूर्ण
गोवा राज्याने 100 टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. शिक्षण व इतर खात्यांच्या सहकार्यातून साक्षरतेचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य झाले आहे. आता, राज्य क्षयरोग (टीबी) मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय शिक्षण खात्याकडून 100 टक्के साक्षरतेची घोषणा
केंद्रीय शिक्षण खात्याच्या संयुक्त सचिव अर्चना अवस्थी यांनी गोवा 100 टक्के साक्षर राज्य झाल्याचे या कार्यक्रमात जाहीर केले. केंद्र सरकारच्या उल्हास न्यू इंडिया उपक्रमांतर्गत गोवा 100 टक्के साक्षर राज्य बनले आहे. वर्ष 2023-24 मध्ये गोव्यातील साक्षरतेचे प्रमाण 93.6 टक्के होते. आता साक्षरतेचे प्रमाण वाढून 100 टक्के झाले आहे, असे अवस्थी यांनी सांगितले.