39 व्या गोवा घटक राज्य दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम शुक्रवार दि. 30 मे रोजी सकाळी 11 वाजता पणजीतील कला अकादमीतील दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री सुभाष फळदेसाई, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहसचिव अर्चना अवस्थी आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. यावेळी गोवा पूर्णपणे साक्षर राज्य म्हणून घोषित केले जाईल आणि हा राज्यासाठी एक महत्त्वाचा क्षण असेल.
या प्रसंगी गोव्यातील प्रतिष्ठित नागरिकांना राज्याच्या आर्थिक विकासात आणि गोव्याची ओळख जपण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित केले जाईल. त्यात बिगफूट लोटली, कॅफे तातो पणजी, गोमंत विद्या निकेतन मडगाव, पॉल जॉन डिस्टिलरीज कुंकळ्ळी, झांट्ये काजू डिचोली, डांगी ऑप्टिशियन म्हापसा, मावझो फोटो स्टुडिओ मडगाव, डॉ. कार्मो ग्रासियास हॉस्पिटल मडगाव, टिटोज् बागा आणि सागर नाईक मुळे (फोंडा) यांचा समावेश आहे. याप्रसंगी, ‘गोवा : पूर्वीचा आणि आताचा’ या गोवा घटकराज्य दिनाशी संबंधित काही दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. अभिलेख खात्याच्या ‘भारत है हम’ या वेब सिरीजचाही यावेळी शुभारंभ केला जाईल. याशिवाय, तीन पुस्तकांचे प्रकाशन होईल. तसेच राज्याला स्वयंपूर्ण बनविण्याच्या प्रयत्नांसाठी स्वयंपूर्ण गावे आणि स्वयंपूर्ण-मित्रांचा याप्रसंगी सत्कार केला जाईल.