देऊळवाडा-माशेल येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या राकेश मुखालाल पासवान (30, मूळ रा. बिहार) याचा घरातील जिवंत वीजवहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. सदर घटना मंगळवारी रात्री 10.30 ते 10.45 वाजण्याच्या सुमारास घडली. विजेचा धक्का बसल्यानंतर गंभीर अवस्थेत त्याला बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; पण तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. राकेश पासवान हा परिसरात गवंडी म्हणून काम करीत होता. तो आठ दिवसांपूर्वीच बिहारमधून गोव्यात परतला होता. म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद साळुंखे यांनी घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मडगाव येथील इस्पितळात दाखल केला आहे. गुरुवारी सकाळी शवचिकित्सा करण्यात येणार आहे.