Home Featured तळपती बॅट निवृत्त

तळपती बॅट निवृत्त

0

भारतीय क्रिकेटप्रेमींचा अत्यंत लाडका फलंदाज विराट कोहलीने काल कसोटी सामन्यांतून निवृत्ती स्वीकारत असल्याची घोषणा केली. रोहित शर्माप्रमाणेच विराटने देखील ‘इन्स्टाग्राम’ वरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. हा निर्णय आपल्यासाठी ‘सोपा’ जरी नसला तरी ‘योग्य’ असल्याची भावनाही त्याने त्यात व्यक्त केली आहे. कोणी थांब म्हणण्याआधी स्वतःच थांबणे अधिक महत्त्वाचे असते. क्रिकेटचे प्रेम भारतीय तरुणाईच्या नसानसांत कसे भिनले आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे विराटसारख्या धडाकेबाज फलंदाजाची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा त्याच्या कोट्यवधी चाहत्यांच्या काळजात कळ उठवून गेली आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये कोण नाही? सध्या चाललेल्या भारत – पाकिस्तान लष्करी संघर्षाच्या संदर्भात पत्रकारांना संबोधित करणारे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी देखील काल पत्रकार परिषदेत आज निवृत्ती स्वीकारीत असलेला विराट हा आपलाही आवडता फलंदाज असल्याचे सांगितले. क्रिकेटचा खेळ हा असा सर्वव्यापी लोकप्रियता मिळवून आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीमध्ये भारतीय क्रिकेटवर अधिराज्य करणाऱ्या विराट कोहलीसारख्या फलंदाजाला ह्यापुढे निदान कसोटी क्रिकेट सामन्यांत पाहता येणार नाही ही खंत सच्च्या क्रिकेट चाहत्यांना किती तीव्रतेने वाटेल हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. विराटने टी ट्वेंटी क्रिकेटमधून ह्यापूर्वीच निवृत्ती स्वीकारलेली आहे. त्यामुळे आता केवळ एक दिवसीय सामन्यांमध्ये त्याची बॅट तळपताना आपल्याला पाहता येईल. परंतु खरे क्रिकेट हे कोणी काही म्हणो, ना टी ट्वेंटीत आहे, ना एकदिवशीय सामन्यांमध्ये. सच्चे क्रिकेटप्रेमी अजूनही कसोटी क्रिकेट हेच त्या खेळाचे खरे स्वरूप असल्याचे मानत आले आहेत. खरे, शास्त्रशुद्ध क्रिकेट कसोटी सामन्यांमधून अनुभवता येत असल्याने विराटची तेथील अनुपस्थिती सर्वांना जाणवल्यावाचून राहणार नाही. त्याच्या खेळातील तंत्रशुद्धता, बॅटवरील हुकूमत, कोणत्याही दबाव, दडपणाखाली शांतपणे व एकाग्रतेने खेळण्याची त्याची हातोटी, संघ दबावाखाली असतानाही विजयश्री खेचून आणण्याची त्याच्यातील धमक, सामन्यातील स्थिती पाहून, खेळपट्टीचा कल पाहून त्यानुसार आपल्या खेळात बदल करण्याची त्याची लवचिकता हे सगळे नवख्या क्रीडापटूंना खूप खूप शिकवून जाणारे होते. त्याच्या फलंदाजीप्रमाणेच त्याचे क्षेत्ररक्षण आणि फिटनेसही नेत्रदीपक होता. त्याच्या फलंदाजीतील आक्रमकतेने नव्या पिढीला अक्षरशः वेड लावले. गेली चौदा वर्षे विराट मैदानात होता. किंग्स्टन येथील वेस्ट इंडीज विरुद्ध भारत कसोटी सामन्यात तो पहिल्यांदा मैदानात उतरला. त्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये त्याने अनुक्रमे चार आणि पंधरा धावा घेतल्या होत्या. भारताने तो सामना 63 धावांनी जिंकला होता. परंतु पुढे विराटची फलंदाजी बहरतच गेली. आजवर एकूण 123 कसोटी सामन्यांत त्याने 9230 धावा काढल्या. निवृत्त होत असताना आपण दहा हजार धावांचा टप्पा गाठू शकलो नाही ह्याची खंत त्याला नक्कीच असेल. परंतु सर्वाधिक सात द्विशतकांचा भारतीय विक्रम त्याच्या नावे आहे आणि द्विशतकांच्या बाबतीत डॉन ब्रॅडमन सारख्यांच्या क्रमवारीत त्याचा क्रमांक पाचवा आहे. विराटची बॅट भारताला गरज असते तेव्हा कशी तळपते त्याचा सुखद अनुभव आपण अनेकदा घेतला आहे. त्याच्या नऊ हजार धावांची सरासरी प्रतिसामना 46.85 भरते. विराट त्याच्या फलंदाजीप्रमाणेच सर्वांच्या स्मरणात राहील तो त्याच्या कप्तानपदाच्या यशस्वी कारकिर्दीमुळे. एक उत्कृष्ट कप्तान असा ठसा त्याने उमटवला. तब्बल 68 कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये त्याने भारताचे कप्तानपद भूषविले. त्यातील चाळीसपेक्षा अधिक सामन्यांत त्याने भारताला आपल्या कुशल रणनीतीद्वारे विजय मिळवून दिला. त्याच्या कारकिर्दीतील भारतीय संघाच्या विजयाची सरासरी 58.82 भरते जी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी येते. तरुणाईच्या गळ्यातला तर विराट हा ताईत बनला होता. एकेकाळी सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांना मैदानात खेळताना पाहून पुढच्या पिढ्यांनी बॅट हाती घेतली, तशाच प्रकारे विराटचा खेळ पाहून नव्या पिढ्या क्रिकेटकडे ओढल्या जात होत्या. मैदानावरील विराटचा वावरही मनोरंजक असायचा. मग ते प्रेक्षकांना रिझवणारे हलके पदन्यास असोत किंवा सहकारी खेळाडूंशी चाललेला त्याचा खाणाखुणांचा संवाद. विराट त्याच्या फलंदाजीप्रमाणेच त्याच्या ह्या सहजसुंदर वागण्यामुळेही अत्यंत लोकप्रिय राहिला. क्रिकेट हे त्याच्यासारख्या खेळाडूंचे सर्वस्व असते. क्रिकेटनेच आपल्याला घडवले, आकार दिला, शिकवले असे तो म्हणाला. विराट केवळ स्वतः घडला नाही, त्याने नव्या पिढ्यांनाही घडवले आहे. त्याचे हे योगदान कायम लक्षात राहील.