काँग्रेस पक्षाच्यावतीने आज (दि. 29 एप्रिल) राजधानी पणजीत ‘संविधान बचाव अभियाना’निमित्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, नंतर या मोर्चाचे रुपांतर आझाद मैदानावर निषेध सभेत होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
संध्याकाळी 4 वाजता पणजीतील ‘दिवजा सर्कल’ येथून मोर्चाला सुरुवात होणार असून, नंतर 4.30 वाजता या मोर्चाचे रुपांतर आझाद मैदानावर निषेध सभेत होणार असल्याचे पाटकर यांनी सांगितले. 75 वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या देशाच्या राज्यघटनेद्वारे देशवासियांना मूलभूत हक्क प्राप्त झाले होते. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून देशवासीयांचे हे मूलभूत हक्कच धोक्यात आलेले असल्याने काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्तरावर ‘संविधान बचाव अभियान’ हाती घेतले असल्याचे पाटकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना पाटकर यांनी राज्य सरकारवर टीकेचा मारा करताना प्रशासन पूर्णपणे ठप्प झाल्याचा आरोप केला. राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून, भाजप सरकारने गोव्याची विक्री सुरू केली असल्याचा गंभीर आरोप पाटकर यांनी केला. गोवा हा दिल्ली व अन्य ठिकाणच्या धनिकांना विकून टाकण्याचे काम राज्यातील भाजप सरकारने हाती घेतल्याचा आरोप पाटकर यांनी केला.
बेरोजगारीच्या बाबतीत गोवा पहिल्या क्रमांकावर
बेरोजगारीच्या बाबतीत गोवा देशात क्रमांक एकवर असल्याचे नीती आयोगाने स्प ष्ट केले असल्याचे सांगून राज्यातील युवा वर्गाला नोकऱ्या मिळत नाहीत. मुख्यमंत्री मात्र निवडणुका जवळ आल्या की 10 ते 15 हजार सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा करीत असतात, अशी टीका अमित पाटकर यांनी केली. ईडीने नुकताच 1 हजार कोटी रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस आणल्याचे सांगून जमीन घोटाळ्याचे तपासकाम करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले गोवा पोलिसांचे विशेष तपास पथक निष्क्रिय ठरले असल्याचा आरोपही पाटकर यांनी केला. या पत्रकार परिषदेला गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतीक्षा खलप, वीरेंद्र शिरोडकर व ऑल्विन दुरादो हेही हजर होते.
> मंगळवारच्या निषेध सभेत गोवा सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला जाईल, असे सांगतानाच काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली होणार असलेल्या या सभेत व मोर्चात गोवाभरातील शेकडो लोक उपस्थित राहणार असल्याचे अमित पाटकर यांनी स्पष्ट केले.