Home Featured पाकचा जळफळाट; प्रत्युत्तरात मोठे निर्णय

पाकचा जळफळाट; प्रत्युत्तरात मोठे निर्णय

0

>> भारतासोबत व्यापार नाही; पाकचे हवाई क्षेत्रही भारतासाठी बंद

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पाच मोठे निर्णय जाहीर केल्यानंतर आता पाकची चांगलीच पंचायत होत असल्याचे चित्र आहे. भारताच्या या कृतीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला असून, सहा मोठे निर्णय घेतले आहेत. भारतीय मालकीच्या सर्व किंवा भारतीय संचालित विमान कंपन्यांसाठी पाकचे हवाई क्षेत्र तात्काळ बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. तसेच अटारी वाघा बॉर्डर पोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासोबत होणारा व्यापारही बंद करण्याचा निर्णय पाकने घेतला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. दहशतवादाविरोधात आता भारताने कठोर पाऊले उचलायला सुरूवात केली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा बंद केला. तसेच 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला होता. तसेच अन्य काही मोठे निर्णय घेतले होते.

भारताने राजनैतिक कोंडी केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद शाहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची (एनएससी) बैठक घेतली. पंतप्रधानांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, सिंधू जल करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दात विरोध करतो. जर भारताने सिंधू पाणी करार थांबवला, तर तो ॲक्ट ऑफ वॉर म्हणजेच युद्धाचा गुन्हा मानला जाईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार रद्द करण्याची धमकी दिली. त्यामध्ये शिमला कराराचाही समावेश आहे.

या बैठकीत पाकिस्ताननेही भारताविरोधात सहा निर्णय घेतले आहेत. त्यानुसार भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद केला जाणार आहे. भारताच्या माध्यमातून इतर कोणत्याही देशासोबत व्यापार होणार नाही. भारतीयांचा सार्क व्हिसा रद्द, भारतीय उच्चायुक्तालयातील लष्कर सल्लागारांना भारतात परतावे लागणार, वाघा अटारी बॉर्डर बंद, इस्लामाबादमधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या 30 वर आणणार आणि भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद या निर्णयांचा समावेश आहे.